नव्या 12 पॉझीटीव्हसह रूग्णसंख्या 208 वर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गुरूवारी रात्री जिल्हय़ातील आणखी 12 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले असून जिल्हय़ातील कोरोनाबाधीतांच्या संख्येने द्विशतक पार केले आहे. नव्या रूग्णांमुळे जिल्हय़ाची रूग्णसंख्या 208 वर पोहचली आहे. दरम्यान आणखी 5 रूग्णांना गुरूवार व शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली.
शुक्रवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 12 नवीन रूग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये संगमेश्वरातील मेघीमध्ये 3, लांजातील कुवे 1, दापोलीतील केळशी, खेर्डी, देवकेमध्ये प्रत्येकी 1, चिपळूणमधील वाघिवरेत 2, तर पांगरीत 3 रूग्ण आढळून आले आहेत.
आणखी 5 जणांना डिस्चार्ज
गुरूवारी चिपळुण तालुक्यातील कोसबे व खेड तालुक्यात मुरडे येथील प्रत्येकी एकाला तर दापोलीतील पाच रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शुक्रवारी सिव्हील हॉस्पीटलमधून 2 शिकाऊ नर्ससह तिघांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. त्यामुळे सिव्हीलमधील सर्वच्या सर्व 8 शिकाऊ नर्स आता कोरोनामुक्त झाल्या आहेत.
दापोलीत गरोदर महिलेसह तिघांना लागण
दापोली : तालुक्यातील 18 रूग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाल्याने दिलासादायक चित्र असतानाच तालुक्यात आणखीन तीन कोरोना बाधीत सापडले आहेत. यामध्ये केळशी येथील नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेचाही समावेश असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या तीन नव्या रूग्णांमुळे दापोलीची रूग्णसंख्या 26 झाली आहे.
केळशीतील गरोदर महिला कोरोनाबाधीत आढळल्याने तिला तातडीने रत्नागिरीतील जिल्हा कोविड रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही महिला 18 मे रोजी मुंबईतून गावी आली असून नियमित तपासणीसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्याने 26 मे रोजी तिचे स्वॅब घेण्यात आले होते. 28 मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचारासाठी तत्काळ रत्नागिरी येथे पाठवण्यात आले. त्याठिकाणी एका स्वतंत्र खोलीत तिची देखभाल केली जाणार आहे. तसेच तिच्यासोबत एका नातेवाईकाला राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तसेच खेर्डी, देवके या गावांमध्ये 16, 17 मे रोजी मुंबईतून आलेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ग्राम कृती दलाच्या सुचनेनंतर त्यांचे नमुने घेण्यात आले होते. हे दोन्ही तरूण क्वारंटाईनमध्ये होते. हे तिघे कोणाकोणाच्या संपर्कात आले होते त्यांचेही नमुने घेतले जाणार आहेत. देवके गावांमध्ये यापूर्वी रूग्ण आढळल्याने कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. आता नवा रूग्ण सापडल्याने कंटेनमेंट झोन कायम राहणार आहे. तसेच खेर्डी व केळशीही प्रतीबंधीत क्षेत्र जाहीर झाला आहे.
चिपळुणात चाकरमान्याचा मृत्यू
मुंबई काळाचौकी येथून 20 मे रोजी आलेल्या 57 वर्षीय चाकरमान्याला गुरूवारी रात्री पोट फुगण्याचा त्रास होऊ कामथे रूग्णालयात आणण्यात आले. मात्र शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह गावात नेऊन मोजक्याच ग्रामस्थ व नातेवाईकांनी कोरोनाच्या धर्तीवर अंत्यसंस्कार केले. मृत्यू होण्यापूर्वी त्याचे नमुने घेण्यात आले आहेत. मुंबई-अंधेरी येथे मृत झालेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या धामेलीतील 12 पैकी सहाजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने आता त्यांच्या संपर्कातील 39 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत.
कुवेत सापडला नवा रूग्ण
जिल्हा रुग्णालयात कुवे गुरववाडी येथील दाखल करण्यात आलेल्या एका 62 वर्षीय वृध्द व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव् आल्याने लांजा तालुक्याची रुग्ण संख्या 8 झाली आहे. कुवे गुरववाडी येथे मुंबईतून आलेल्या 62 वर्षीय वृध्द व्यक्तीला गंभीर लक्षणे आढळल्याने सोमवारी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान, तालुक्यात दोघांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून उपचाराखालील रूग्णांची संख्या 6 आहे.