प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ होत आहे. रविवारी प्राप्त झालेल्या 122 अहवालानुसार 107 अहवाल निगेटीव्ह आले असून 14 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या 270 वर जावून पोहोचली आहे. यामध्ये रत्नागिरी 4, लांजा 3, गुहागर 3, कामथे 3, दापोली 1 असा रूग्णांचा समावेश आहे. यामध्ये 98 रूग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर 9 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झालेले बहुतांश रुग्ण हे चाकरमानी व होम क्वारंटाईनमध्ये दाखल होते. सध्या दरदिवशी 10 ते 25 संख्येने बाधीत रुग्णांची जिल्हय़ात भर पडत आहे. ग्राम कृती दल, नागरी कृती दलावर आता होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांची देखभाल करणे तसेच त्यांच्यापैकी कोणाची तब्बेत बिघडल्यास आरोग्य यंत्रणेला अहवाल सादर करणे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चिपळुणातील मृत चाकरमानी कोरोनाबाधित
चिपळूण: काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या दोणवली येथील चाकरमान्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबाला यापूर्वीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत त्याच्यासह तिघांची भर पडल्याने तालुक्याचा आकडा 40 वर पोहोचला आहे. मात्र बरे होण्याचे प्रमाणही अधिक असल्याने ही दिलासादायक बाब आहे. रूग्ण सापडल्याने धामणवणे व कुटरे गाव आयसोलेट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चिपळूण तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वत्र भीती निर्माण झाली असून अनेक गावे आयसोलेट करण्यात आली आहेत. 20 मे रोजी मुंबई काळाचौकी येथून 57 वर्षीय चाकरमानी आला होता. त्याला काही दिवसांपूर्वी पोट फुगण्याचा त्रास होऊ लागल्याने कामथे रूग्णालयात आणण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर कोरोनाच्या शिष्टाचाराप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्याचा अहवाल त्याचा रविवारी प्राप्त झाला. मृताला कोरोनाची बाधा झाल्याचे त्यातून स्पष्ट झाले. त्याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर त्याच्या 8 नातेवाईकांचे नमुने घेतले गेले असून त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेबरोबरच धामणवणे व कुटरे येथील 2 रूग्णांची भर पडली आहे. चिपळूण तालुक्याचा बाधितांचा आकडा 40वर पोहोचला आहे. 2 रूग्ण सापडल्यानंतर तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांनी गावात भेट देऊन पाहणी केली. हे गाव आयसोलेट करण्यात आले असून येथे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बाधितांचा आकडा वाढत चालला असला तरी बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. आतापर्यंत 5जण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच अहवाल निगेटिव्ह आलेल्या 11 जणांनाही घरी पाठवण्यात आले आहे. सध्या कामथे रूग्णालय व सावर्डे-वहाळफाटा येथील कोविड सेंटरमध्ये 25 बाधित रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर 41 जण देखरेखीखाली आहेत.
गरोदर महिला पॉझिटिव्हच
काही दिवसांपूर्वी कापरे येथील गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालावरुन स्पष्ट झाले होते. सध्या तिच्यावर कामथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचा पती व मुलगी बरी झाली आहे. तिच्या प्रसुतीची तारीखही जवळ येत असल्याने आरोग्य विभाग या महिलेवर विशेष लक्ष ठेवून आहे.
राजापुरात आणखी 2 रूग्णांची वाढ
राजापूर: तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. शनिवारी आणखी 2 रूग्ण सापडल्याने तालुक्यातील कारोनाबाधितांची संख्या 23 झाली आहे. सेफझोनमध्ये असलेल्या राजापूर तालुक्यात मुंबईकर चाकरमानी दाखल होऊ लागल्यापासून कोरोनाने शिरकाव केला आहे. विखारे-गोठणे येथे तालुक्यातील पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यानंतर सातत्याने तालुक्यातील विविध गावांमध्ये आलेले चाकरमान्यांचे कारोनो अहवाल पॉझिटीव्ह येत आहेत. शुक्रवारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 21वर होती. अशातच शनिवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात ओणी व धारतळे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. सापडलेले दोन्ही रूग्ण मुंबईतून गावी आलेले आहेत. दरम्यान तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 23वर पोहोचला आहे. यात प्रिंदावन 7, वडदहसोळ 5, कशेळी 4, ओणी 3 व विखारे गोठणे, कोतापूर, धारतळे, सागवे-गोठिवरे येथील प्रत्येकी 1 रूग्णांचा समावेश आहे.
गुहागरात 5जण कोरोनामुक्त, 3 रूग्णांची वाढ
गुहागर: तालुक्यात रविवारी आणखी 3 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. गुहागरमथ्ये कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 12 रुग्णांपैकी 5 रुग्णांना शनिवारी व रविवारी ते बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आले. त्या पाचहीजणांचे घरामध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. या आनंदाच्या बातमीसह रविवारी तालुक्यात आणखी तीन रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.
यामध्ये शहरात प्रथमच कोरोनाने शिरकाव केला आहे, तर 28 मे रोजी वरवेली येथील मृत झालेले 63 वर्षीय रूग्णाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तसेच हेदवी-मुसलोंडी येथील मिळालेल्या पॉझिटिव्ह रुग्णासोबत प्रवास केलेल्या एकूण 11जणांपैकी एकजण पॉझिटिव्ह आला आहे. शहरात आलेला रुग्ण 18 मे रोजी नालासोपारा येथून आला होता. नालासोपारा येथून आल्यावर हा रुग्ण व त्याच्याबरोबर आलेले आणखी 7जण शहरातील एका अंगणवाडीमध्ये विलगीकरण कक्षात होते. या रुग्णाची तब्येत ढासळल्याने 28 मे रोजी त्याला गुहागर ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याचवेळी त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नगर पंचायत कार्यक्षेत्रात खळबळ माजली आहे तालुक्यातील रुग्णसंख्या आता 19वर पोहोचली आहे. यामध्ये मृतांचा आकडा 2, पूर्णपणे बरे झालेले 6, तर उपचार घेणारे 11जण आहेत. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण 29जणांच्या घेतलेल्या स्वॅबपैकी 24 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे केवळ 5जणांचे अहवाल शिल्लक होते. रविवारी दुपारी त्यांचा अहवाल आल्याने यामध्ये तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गुहागर तालुक्यात शृंगारतळी, जामसुत, सडेजांभारी, वेळंब, पांगारी, वेळंब-घाडगेवाडी व हेदवी या गावांमध्ये आत्ता वरवेली व गुहागर शहराचा समावेश झाला आहे