चोरीच्या 11 दुचाकी हस्तगत, गुन्हे प्रकटीकरणची कारवाई
प्रतिनिधी/ कराड
सातारा, सांगली जिह्यातून दुचाकी लंपास करणारी टोळी कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केली. या टोळीकडून दोन्ही जिह्यात चोरलेल्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी तिघांना पलूस (जि. सांगली) येथून सापळा रचून अटक केली. या टोळीकडून आणखी चोरीच्या दुचाकी हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड, मलकापूर येथून गत सहा महिन्यांत अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. कृष्णा रुग्णालयासमोरून जास्त दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, दुचाकी चोरी प्रकरणांचा छडा लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी कराड पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस संशयितांचा शोध घेत होते. दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संजय जाधव यांना पलूस येथील काही संशयितांनी कराडात दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली. चोरीच्या दुचाकी विटा येथे विकल्याची माहितीही समोर आली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे शाखेचे विजय गोडसे यांनी संजय जाधव, जयसिंग राजगे, सचिन साळुंखे, नितीन येळवे, प्रफुल्ल गाडे, विनोद माने यांचे विशेष पथक तयार करून सापळा रचला. या पथकाने सांगली जिह्यातील पलूस, विटा परिसर पिंजून काढत तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी कराड, बहे, आरग, बोरगाव येथून दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. त्यांना अटक करून तपास केला असता त्यांनी या परिसरातून चोरी केलेल्या अकरा दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या. या टोळीतील आणखी एकास ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या टोळीने दोन जिह्यात दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे समोर येत आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे.