प्रतिनिधी/ सातारा
राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा व कराड विभागाच्या भरारी पथकांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत जिल्हय़ात चालणाऱया गोवा राज्यातील अवैध दारु साठा बाळगणाऱया वाईतील एकासह दारुची वाहतूक करणाऱया कोल्हापूरातील दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातील 4 लाख 79 हजार 340 रुपयांची गोवा राज्यातील अवैध दारु जप्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 19 व 20 रोजी राज्य उत्पादन शुल्क सातारा व कराड येथील भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये वाई तालुक्यातील सिध्दनाथवाडी येथे गोवा राज्यातील विदेशी दारुचा साठा करुन ठेवण्यात आलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तिथे 1 लाख 94 हजार 430 रुपये किंमतीच्या 325 विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी प्रसाद शामराव जायगुडे (रा. सिध्दनाथवाडी, वाई) याच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गंत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
तर याच भरारी पथकांनी मलकापूर, ता. कराड येथे गोवा राज्यातील विदेशी दारु विक्रीसाठी महाराष्ट्रात घेवून आलेल्या श्यामकुमार श्रीचंद मुलचंदाणी वय 33 रा. गांधीनगर, कोल्हापूर, व सुनील राजकुमार मनचुंडिया वय 36, रा. गांधीनगर, कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील 750 मिलीच्या 120 विदेशी दारुच्या बाटल्या, चाकचाकी वाहन, दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 85 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर. एल. पुजारी, निरीक्षक संजय साळवी, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, अजित रसाळ, सचिन खाडे, महेश मोहिते, संतोष निकम, जीवन शिर्के, नितीन जाधव, किरण जंगम, भीमराज माळी, उर्वेश पाटील, तुषार महाजन यांनी विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार व अधिक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला.