देवरूखनजीकच्या पूरमधील घटनेत प्रौढाचा मृत्यू, एक बेपत्ता, तिसऱयाला वाचवले
वार्ताहर/ ताम्हाने, चिपळूण
जिल्हय़ात नदीपात्रात दोन वेगवेगळय़ा घटनेत नदीपात्रात चौघेजण बुडाल्याची घटना घडली. नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एका प्रौढाचा बुडून मृत्यू झाला तर यातील एक तरुण बेपत्ता असून एका तरुणाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. ही घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीकच्या पूर-झेपलेवाडी येथे बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडली. दरम्यान 5 दिवसाच्या गणेश विसर्जनासाठीग्न चिपळूण तालुक्यातील तुरंबव परिसरातील कापसी नदीत गेलेला तरूण दगडावरुन पाय घसरून नदीत तोल जाऊन पडून बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6.30च्या सुमारास घडली.
यामध्ये अशोक सोनू झेपले (50) यांचा मृत्यू तर हर्ष संजय घाटकर (15) याला वाचविण्यात यश आले असून संजय सीताराम घाटकर (45) हे बेपत्ता आहेत. गणेशोत्सवात मौजमजा लुटण्यासाठी पूर-झेपलेवाडी येथील काही चाकरमानी गावाकडे आले आहेत. बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास काही चाकरमानी व गावातील स्थानिक तरुण असे सुमारे दहाजण सप्तलिंगी नदीपात्रातील जांभळीचे उतरण येथे पोहण्यासाठी गेले होते. गेले 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सप्तलिंगी नदी दुथडी भरुन वाहत आहे. दहा तरुणांपैकी तिघाजणांनी प्रथम पोहण्यासाठी नदीपात्रात झेप घेतली. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब नदीकिनारी असणाऱया तरुणांच्या लक्षात येताच बुडणाऱयांना वाचविण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. यातील अशोक सोनू झेपले व हर्ष संजय घाटकर यांना वाचविण्यात यश आले. ही बातमी ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. यानंतर अशोक झेपले व हर्ष घाटकर यांना उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी मात्र वैद्यकीय सूत्रांनी तपासणी केल्यानंतर यातील अशोक झेपले यांना मृत घोषित करण्यात आले. तर हर्ष घाटकर याच्यावर उपचार सुरु आहेत. अशोक झेपले यांना मृत घोषित करताच पत्नी व मुलीने रुग्णालयात फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांसह पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष सडकर, सचिन भुजबळराव, किशोर जोयशी, जावेद तडवी यांनी घटनास्थळी जावून पाहणी व पंचनामा केला. पोहण्यासाठी गेलेल्यांपैकी संजय सीताराम घाटकर हे बेपत्ता झाले असून ग्रामस्थ त्यांचा शोध घेत आहेत. शोध मोहिमेत ग्रामस्थांबरोबरच राजू काकडे हेल्प ऍकॅडमीचे कार्यकर्ते व देवरुख घोरपीवाडीतील पोहण्यात तरबेज असणारे तरुण सहभागी झाले होते. येथील संपूर्ण नदी परिसर पिंजून काढण्यात आला. सायंकाळी 7 पर्यंत ही शोधमोहीम सुरु होती. या दरम्यान संजय घाटकर हे मिळून आलेले नाहीत. काळोख पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. या दुदैवी घटनेमुळे पूर-झेपलेवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
कापसी नदीत गेलेला तरुण बुडाला
पाच दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी चिपळूण तालुक्यातील तुरंबव परिसरातील कापसी नदीत गेलेला तरूण दगडावरुन पाय घसरून नदीत तोल जाऊन पडून बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6.30च्या सुमारास घडली. हा तरुण नदी परिसरात न सापडल्याने त्याचा बुधवारी शोध सुरू होता. सावर्डे पोलिसात या बाबत बेपत्ता म्हणून नोंद झाली आहे. रजनीकांत गोपीनाथ पंडित (34, तुरंबव-गणेशवाडी, ता. चिपळूण) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंडित हा 5 दिवसाच्या गणेश विजर्सनासाठी तुरंबव परिसरातील कापसी नदीत गेला होता. यावेळी त्याचा पाय एका दगडावरुन घसरल्याने तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. यावेळी त्याचा शोध घेतला असता तो कोठेही सापडलेला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी गेले होते. बुधवारी देखील कापसी नदी पसिरात त्याची शोधमोहीम सुरु करण्यात आली.