- कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाचा आराखडा तयार
- पहिल्या टप्प्यात शासकीय, खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविकांना लस देणार
- लसीकरणासाठी 286 जणांच्या नियुक्त्या
- दुसऱया टप्प्यात एसटी, पोलीस कर्मचारी, वयोवृद्धांना लसीकरण
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
गेले वर्षभर जगात हाहाकार उडविणाऱया ‘कोरोना’ची लस लवकरच सिंधुदुर्गात दाखल होणार असल्याने जिल्हय़ात पहिल्या टप्प्यात कुणाकुणाला लस द्यायची, याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेशी निगडीत असणाऱया साडेसात हजार लोकांना ही लस देण्याची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. यामध्ये शासकीय व खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. कोरोना लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.
गेले वर्षभर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक लोकांचे त्यामध्ये बळी गेले. कोरोना नियंत्रणासाठी दिवस-रात्र सर्व प्रशासकीय यंत्रणा राबत असून कोरोनाची लस कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. डिसेंबर 2020 अखेर कोरोना लस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना लस देण्याची पूर्वतयारी सर्वत्र सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानेही याची पूर्वतयारी म्हणून आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखालील टास्कफोर्सची एक बैठक झाली असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच आणखी एक बैठक होणार आहे.
286 डॉक्टर्स, कर्मचारी नियुक्त
कोरोनाची लस तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तर दुसऱया व तिसऱया टप्प्याची माहिती अद्याप शासनाने मागितलेली नाही. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेशी निगडीत असणाऱया 7 हजार 556 व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यामध्ये जिल्हय़ातील 58 शासकीय रुग्णालयांमधील 5 हजार 449 जणांचा समावेश आहे. तर खासगी डॉक्टर, नर्सिंग होममधील 1 हजार 107 जणांना लस दिली जाणार आहे. शासकीय, खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनाही पहिल्या टप्प्यात ही लस दिली जाणार आहे. तसेच साडेसात हजार व्यक्तींना लस देण्यासाठी 286 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याची सर्व तयारी करण्यात आली असून प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
शीतसाखळीची व्यवस्था
जिल्हय़ात कोरोनाची लस उपलब्ध झाल्यानंतर ही लस ठेवण्यासाठी पुरेशी यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली आहे. शीतसाखळी तयार करण्यात आली असून 2 लाखाहून अधिक लस ठेवण्याची क्षमता असणारी शीतसाखळी जिल्हय़ात सद्यस्थितीत उपलब्ध आहे. लसीकरणादरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात येणार असून कोविडच्या नियमांचे पालन होण्यासाठी जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणापर्यंत लसीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे. लस देताना योग्य प्रकारे नियोजन होण्यासाठी जिल्हा परिषदेचे विविध विभाग, रोटरी क्लब, युनिसेफ, इंडियन मेडिकल असोसिएशन, महिला व बालविकास प्रकल्प या विविध विभागाकडून सहकार्य घेतले जाणार आहे.
दुसऱया टप्प्यात सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी
लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱया टप्प्यात जनतेशी निगडीत असणाऱया रेल्वे, बसस्थानकावरील कर्मचारी, एसटी कर्मचारी, पोलीस, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आणि वयोवृद्ध नागरिक यांना लसीकरण केले जाणार आहे. मात्र, याबाबतचे नियोजन अद्याप प्राथमिक टप्प्यावर असून पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱया व तिसऱया टप्प्यातील लसीकरणाचा आराखडा अंतिम केला जाणार आहे.
सूक्ष्म नियोजनाच्या सूचना
डिसेंबरअखेरीस किंवा 2021 मध्ये नव्या वर्षात लस येण्याची शक्यता असल्याने ही लस सिंधुदुर्ग जिल्हय़ातील नागरिकांना देण्याच्या दृष्टीने सर्वप्रकारची तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरापर्यंत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्या दृष्टीने आरोग्य विभागामार्फत शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर तयारी केली जात आहे. सर्व कर्मचाऱयांच्या नेंदी घेतल्या जात आहेत. 2020 हे वर्ष कोरोनाच्या संकटामुळे चिंतेचे गेले तरी 2021 या नवीन वर्षात चांगली सुरुवात होण्याची आशा जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.