प्रतिनिधी/ सातारा
ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सलग दोन दिवस निच्चांकी बाधित वाढ समोर आल्याने याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्बंध सैल करण्याचा आदेश देत सर्व हॉटेल्स, उपहारगृहांना रात्री 12 वाजेपर्यंत तर इतर सर्व आस्थापनांना रात्री 11 वाजेपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने जगरहाटीला आणखी गती येणार आहे. सलग दोन दिवस निच्चांकी बाधित वाढ समोर आली असून जिल्हय़ाची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरु असल्याचे सद्यचित्र जिल्हावासियांना दिलासा देत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून इंडियन कोव्हिड पोर्टलवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 33 जणंचा अहवाल बाधित आला असून एकाही बाधिताचा मृत्यू नाही. मात्र, दोन मृत्यूची नोंद उशिरा करण्यात आलेली आहे. तर मंगळवारी सायंकाळी 161 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
हॉटेल्ससह सर्व आस्थापनांची वेळ वाढली
ऑगस्ट महिन्यात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर जिल्हय़ातील हॉटेल, उपहारगृहांसह इतर आस्थापनांना रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवीन आदेश जारी करुन जिल्हय़ातील सर्व उपहारगृहे, भोजनगृहे यांना रात्री 12 वाजेपर्यंत तर इतर आस्थापनांना रात्री 11 पर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्यास मुभा दिली आहे. वेळ वाढवल्यामुळे गर्दीला रोख लागणार असून त्यामुळे सामाजिक अंतर राखणे सुलभ होणार आहे.
साताऱयात खूप दिवसांनी एक अंकावर
सोमवारी रात्रीच्या अहवालाने जिल्हय़ाला मोठा दिलासा दिला असून सलग दोन दिवस बाधित वाढ 50 च्या खाली राहिली असून हॉटस्पॉट सातारा तालुक्यात अल्पवाढीतही दोन अंकी वाढ सुरुच होती. मात्र, सातारा खूप दिवसांनी एक अंकी संख्येवर आला आहे. तर सात तालुक्यात एक अंकी अल्प वाढ झालेली असून पाटण, वाई व जावली तालुक्यात एक नवीन रुग्ण समोर आला नसल्याने या तिन्ही तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरुच आहे. कराड तालुक्यात फक्त 3 नवीन रुग्ण असून कराडवासियांना देखील दिलासा लाभला आहे.
32 जणांचा अहवाल बाधित
सोमवारी रात्रीच्या 12 वाजताच्या अहवालानुसार आजचे व आजअखेर बाधित झालेल्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी आहे. सातारा 8 (51,892), फलटण 6 (37,348), माण 5 (17,946), खंडाळा 3 (14,185), कराड 3 (39,180), खटाव 3 (25,833), कोरेगाव 1 (21,914), महाबळेश्वर 1 (4,708), पाटण 0 (10,135), वाई 0 (15,743), जावली 0 (10,030), इतर 0 (2,162) असे एकूण 2,51,078 आजअखेर बाधित झालेल्याची संख्या आहे.
मंगळवारी 8,643 जणांचे लसीकरण
जिल्हय़ात मंगळवारीही लसीकरणाचा वेग वाढला होता. त्यामुळे दिवसभरात 8 हजार 643 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामुळे जिल्हय़ात लस घेणाऱया नागरिकांची एकूण संख्या 27 लाख 98 हजार 401 एवढी दिलासादायक झालेली असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 52 हजार 766 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 45 हजार 635 एवढी झालेली आहे.
जिल्हय़ात 4,389 बेड रिक्त
आजमितीस जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,611 एकूण बेड संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 224 एवढी असून हॉस्पिटलमध्ये 4,389 बेड रिक्त आहेत. यामध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह बेडवर 34 रुग्ण, आयसीयू व्हेंटीलेटरविना 65 व कोरोना केअर सेंटरमध्ये 125 रुग्ण असे 224 एवढेच रुग्ण प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून सक्रीय रुग्ण संख्या 579 एवढी असून त्यापैकी हॉस्पिटलमधील रुग्ण सोडल्यास सौम्य लक्षणे असलेले 355 नागरिक होम आयसोलेट आहेत.