जनावरांना मिळणार घरोघरी उपचार : पशुसंगोपनच्या ताफ्यात 17 फिरती वाहने
प्रतिनिधी/ बेळगाव
शेतकऱयांच्या जनावरांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी पशुसंगोपन खाते फिरती पशुचिकित्सालये सुरू करणार आहे. बेळगाव जिल्हय़ात लवकरच 17 फिरती चिकित्सालये धावणार असल्याने घरोघरी जनावरांना वेळेत उपचार मिळणार आहेत. शिवाय पशुसंगोपनच्या ताफ्यात 17 फिरती वाहने दाखल होणार असल्याने जनावरांसंबंधी असलेल्या समस्या तातडीने मार्गी लागणार आहेत.
जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्या तुलनेत दवाखान्यांची संख्या अगदी कमी आहे. त्यामुळे जनावरांना वेळेत उपचार मिळणे अशक्मय बनले आहे. अशा परिस्थितीत ही फिरती पशुचिकित्सालये उपयुक्त ठरणार आहेत. राज्यात एकूण 275 फिरती चिकित्सालये सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी 17 फिरती वाहने बेळगाव जिल्हय़ात सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील पशुपालकांच्या जनावरांनाही आता वेळेत उपचार मिळणार आहेत.
पहिल्या टप्प्यात बेंगळूर आणि कलबुर्गी विभागात वाहनांचे वाटप झाले होते. आता इतर ठिकाणी वाहने सुरू केली जात आहेत. बेळगावातही लवकरच फिरती चिकित्सालये सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे जनावरांना कृत्रिम लसीकरण, औषधोपचार आणि इतर उपचार लवकर उपलब्ध होणार आहेत. जिल्हय़ात पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी असल्याने पशुपालकांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे आर्थिक भुर्दंडही बसतो. अशा परिस्थितीत ही फिरती चिकित्सालये शेतकऱयांना आधार ठरणार आहेत.
1962 टोल फ्री क्रमांकावर पशुपालकांनी कॉल करावा
फिरत्या चिकित्सालयांच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 1962 या टोल फ्री क्रमांकावर पशुपालकांनी कॉल करावा. या हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर उपचार करण्यासाठी शेतकऱयांच्या दारापर्यंत पशुचिकित्सालय वाहन येणार आहे. या फिरत्या दवाखान्यांमुळे जनावरांना आरोग्याच्या सुविधा तातडीने उपलब्ध होणार आहेत.
– डॉ. राजीव कुलेर (उपनिर्देशक, पशुसंगोपन खाते)