रविवारी 201 नवे रुग्ण, 316 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना महामारीचा फैलाव आटोक्मयात येत आहे. 20 हजारांच्या घरात असलेली सक्रिय रुग्णसंख्या आता 3 हजारांवर आली असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. रविवारी 201 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 316 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हय़ातील बाधितांचा आकडा 74 हजार 675 वर पोहोचला असून त्यापैकी 70 हजार 969 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 2 हजार 965 सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा 741 वर पोहोचला आहे. बेंगळूर, चिक्कबळ्ळापूर, चिक्कमंगळूर, मंगळूर, हासन, कोडगू, शिमोगा, मंडय़ा, तुमकूर, उडुपी, कारवारबरोबरच बेळगाव जिल्हय़ातही अद्याप तीन अंकी रुग्ण सापडत आहेत.
अद्याप 2 हजार 361 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 9 लाख 10 हजार 960 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 लाख 29 हजार 719 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सक्रिय रुग्णसंख्या घटत असली तरीही आरोग्य विभागाने तपासणी वाढविली आहे. सोमवारपासून लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात येणार असून एकंदर तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.
रविवारी हिंडलगा, गौंडवाड, कलखांब, कंग्राळी खुर्द, खणगाव बी.के., काकती, कुदेमनी, सांबरा, पिरनवाडी, अनगोळ, अशोकनगर, अयोध्यानगर, आझमनगर, गणेशपूर, नेहरूनगर, गोंधळी गल्ली, शांतीनगर-टिळकवाडी, भवानीनगर, कणबर्गी, महांतेशनगर, मण्णूर, नानावाडी, टिळकवाडी, राणी चन्नम्मानगर, उज्ज्वलनगर, खासबाग, वीरभद्रनगर, विनायकनगर, मुरलीधर कॉलनी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
चिकन दुकानदारांवर गुन्हा लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱया चिकन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी गल्ली, शहापूर येथील कोहेतूर चिकन सेंटरचे असिफ मुजावर, रा. खंजर गल्ली, परवेझ शेख, रा. वडगाव या दोघा जणांवर शहापूर पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली. दरम्यान, रविवारी दिवसभरात लॉकडाऊन नियम मोडणारी 37 वाहने जप्त करण्यात आली असून विनामास्क फिरणाऱया 157 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.