प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात खासगी रुग्णालयातही कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. या लसीसाठी रुग्णालयांना 250 रुपये दर आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातील 150 रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत. पंतप्रधान आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱया रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार जिल्हय़ात 21 खासगी हॉस्पिटल्सच्या माध्यमातून ही लस देण्याचे काम करण्यात येणार आहे. शासनाकडून आरोग्य विभागाला गाईडलाईन्स आलेल्या नाहीत मात्र लसीकरण लवकरच सुरु होईल, असे सांगण्यात आले.
केंद्र शासनाने नुकतीच 60 वर्षांपुढील सर्व व्यक्तींना, तर 45 वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या (को-मोर्बिलिटी) नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार या लसीसाठी रुग्णालयांना 250 रुपये दर आकारण्यास परवानगी मिळाली आहे. यापैकी 150 रुपये शासनाकडे भरावे लागतील, तर शंभर रुपये रुग्णालय प्रशासनाला मिळतील.
दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाकडून 21 रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर 100 या प्रमाणे दिवसाला पाच हजार लस मोफत देण्याचे नियोजन करण्याचे काम सुरु आहे. मात्र, प्रत्यक्षात शासनाकडून अशा गाईडलाईन आरोग्य विभागाला आलेल्या नाहीत. लस उपलब्ध असून ती खासगी हॉस्पिटल्समध्ये स्टोअर करण्याच्या सुविधा आहेत का? लस देण्याबाबत त्यांनी नियोजन केलेले आहे की नाही? असे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
मात्र, शासनाकडून गाईडलाईन आल्यानंतर खासगी हॉस्पिटल्सना लस उपलब्ध करुन देणे व पंतप्रधान मृतवंदना योजनाखाली असलेल्या खासगी हॉस्पिटल्सच्या माध्यमातून लसीकरण करुन घेण्याबाबतचे नियोजन आरोग्य विभागाकडून केले जाईल. केंद्र सरकारने खासगी हॉस्पिटल्समधून लस देण्याचे जाहीर केले असले तरी जिल्हा पातळीवरील यंत्रणेला त्याबाबतच्या लेखी गाईडलाईन अद्यापपर्यंत देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सोमवारपासून जरी खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरु होणर असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी नियोजन करेपर्यंत अजून चार पाच दिवस लागू शकतील.
जिल्हय़ात या हॉस्पिटल्समध्ये लसीकरण
जिल्हय़ात 21 खासगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण सुरु होणार असून यामध्ये वाईतील मानसी मेमोरिअल हॉस्पिटल, गीतांजली हॉस्पिटल, घोटवडेकर हॉस्पिटल, साताऱयातील यशवंत हॉस्पिटल, संजिवनी आयसीयू प्रा. लि., श्री मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर, के. एन. गुजर मेमोरियल हॉस्पिटल, आन्को लाईफ कॅन्सर सेंटर प्रा. लि., कराडमध्ये सहय़ाद्री हॉस्पिटल प्रा. लि, कोळेकर हॉस्पिटल, शारदा क्लिनिक, पाटील हॉस्पिटल, म्हसवडमध्ये डोलताडे हॉस्पिटल, फलटणमध्ये सावित्री हॉस्पिटल, चिरंजीवन हॉस्पिटल, फलटण लाईफलाईन हॉस्पिटल प्रा. लि., केएमआयएफ निकोप हॉस्पिटल, लोणंद यांचा समावेश आहे.
ऍपद्वारे व प्रत्यक्ष केंद्रातही नोंदणी सुविधा
लाभार्थ्यांनी आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा सरकारने दिलेले ओळखपत्र सोबत नेणे आवश्यक आहे. ह तसेच इतर आजार असलेल्या 45 ते 59 या वयोगटातील नागरिकांसाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. पूर्वनोंदणी आवश्यक इच्छुक लाभार्थींना ’कोविड 2.0’ तसेच ’आरोग्य सेतू या ऍपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रात जाऊनही नोंदणी करता येईल.