कुठे फटाके तर कुठे पुष्पहाराने स्वागत, दुकानांसमोर मद्यपींची भाऊगर्दी
प्रतिनिधी / बेळगाव
तब्बल बेचाळीस दिवसांनंतर सोमवारी बेळगाव शहर व जिल्हय़ात दारू दुकाने उघडली. कोणी फटाक्मयांची आतषबाजी करून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले तर आणखी कोणी दुकानदाराने आपल्या पहिल्या ग्राहकाच्या गळय़ात पुष्पहार घालून विक्रीचा शुभारंभ केला. जिल्हय़ात 225 तर बेळगाव शहरात 42 दुकानातून सोमवारी दारुविक्री झाली.
पहाटेपासूनच वाईन शॉप व एमएसआयएल दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. आरपीडी क्रॉसजवळील एका वाईन शॉप मालकाने आपल्या पहिल्या ग्राहकांच्या पुष्पहार घालून विक्रीचा शुभारंभ केला. तर आणखी काही ठिकाणी दुकानमालक पोहोचण्याआधीच दुकानाचे पूजन केल्याचे दिसून आले.
घटप्रभा येथे तर तळीरामांनी वाईन शॉपसमोर फटाक्मयांची आतषबाजी केली. अनेक ठिकाणी रांगेत तरुणीही दिसून आल्या. राज्य सरकारच्या आदेशानुसार सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत दुकानाची वेळ ठरविण्यात आली होती. मात्र, गर्दीमुळे व्यवस्था कोलमडल्याने लाठीहल्ला करून पोलिसांनी दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
दुपारपर्यंत ज्यांनी खरेदी केली होती, त्यांना दारुसाठा मिळाला. यासंबंधी अबकारी उपायुक्त बसवराज संदीगवाड यांच्याशी संपर्क साधला असता सोमवारी जिल्हय़ातील 225 दुकानातून दारुविक्री झाली आहे. यामध्ये बेळगाव शहरात 38 वाईन शॉप व एमएसआयएलची चार अशा 42 दुकानातून मद्यविक्री झाल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या दिवशी नेमका किती कोटा विकला गेला त्याचा तपशील मंगळवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.