प्रतिनिधी/ सातारा
मुंबई, पुणेसह अनेक मेट्रो शहराच्या तुलनेत खूपच कमी असलेल्या सातारा जिल्हय़ात दररोज येणारे बाधितांचे आकडे थरकाप उडवत आहेत. जिल्हय़ाची लोकसंख्या सुमारे 35 लाख मात्र आजअखेर जिल्हय़ात 1 लाख 62 हजारावर रुग्ण संख्या गेली आहे. जिह्यात दररोज सुमारे 12 हजार स्वॅब तपासणी केले जातात. त्यापैकी दोन हजारावर बाधित येत असून पॉझिटीव्हीटी 20 टक्क्याच्या आसपास आहे. सातारा शहराबरोबरच तालुक्यातील स्थिती अद्याप जैसे थेच आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱया लाटेत फलटण तालुक्यात भीषण परिस्थिती आहे. सध्या येणारे आकडे धडकी भरवणारे असले तरी ते आकडे कसे वाढतात हे फलटणकरांना कोडे सुटले नाही. आरोग्य विभागाच्या चुकीमुळेच हे आकडे दिसत असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, दिवसभरात 2257 जण बाधित तर 24 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. त्याचबरोबर तब्बल 2398 रुग्णांना मुक्त करण्यात आले आहे.
कोरोनाचा विळखा जरी जिह्यातील प्रत्येक गावाला बसला असला तरी आतापर्यंत 1,62,712 जण पॉझिटिव्ह आहेत. त्यात सातारा तालुक्याचा नंबर सर्वात पुढे आहे. सातारा तालुक्यातील मोठय़ा गावांबरोबर सातारा शहर ही सुरुवातीपासून आघाडीवर राहिले आहे. त्यात शहरातील खाजगी हॉस्पिटल आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱया रुग्णामुळे शहरावर ताण पडतो आहे. शहरातील हॉटस्पॉट म्हणून असा कोणताही भाग अधोरेखित नाही. स्मॉल एरियात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्वीपासून कमी राहिला आहे. होम आयसोलेशनमधील रुग्ण नियम पाळत नसल्याने संसर्ग वाढत आहे. त्यामुळे होम आयसोलेशन शहरातील बहुतांशी ठिकाणचे बंद झाले असून ज्यांच्या घरी स्वतंत्र सोय नाही ते संस्थात्मक विलीनीकरण कक्ष गाठून तेथे उपचार घेताना दिसत आहेत. मृतांचा आकडा ही सातारा शहरात बाहेरून उपचार घेणाऱयांमुळे वाढताना दिसत आहे.
लसीकरण केंद्रावर अजून घोळ कायम
प्रत्येकाला लस घ्यायची आहे. लस ज्या दिवशी येथे त्यांच दिवशी ती दिली जाते. त्याकरिता टोकन पद्धत तर ऑनलाईन बुकिंग पद्धत ही आहे. पहाटे पासून टोकनच्या नंबर रांग असते. टोकन मिळविले तरी लसीकरण घ्यायला थांबावे लागते. ग्रामीण भागात तर वाडय़ा वस्तीवरून चालत ग्रामस्थ लसीकरण केंद्र सकाळी गाठतात अन् दुपारी तेथील डॉक्टर लस नाही म्हणून सांगतो अशी परिस्थिती आहे.
2257 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 24 बाधितांचा मृत्यू
सातारा जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2257 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 24 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आजअखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 58 (7372), कराड 213 (21922), खंडाळा 82 (10194), खटाव 247 (15322), कोरेगांव 126 (13913), माण 75 (10987), महाबळेश्वर 4 (3969), पाटण 90 (6592), फलटण 955 (25266), सातारा 317 (34716), वाई 71 (11427) व इतर 19 (1032) असे आज अखेर एकूण 162712 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. जावली 0 (164), कराड 5 (631), खंडाळा 0 (131), खटाव 3 (407), कोरेगांव 2 (311), माण 2 (207), महाबळेश्वर 0(43), पाटण 1 (157), फलटण 1 (246), सातारा 9 (1019), वाई 1 (300) व इतर 0 असे आजअखेर जिह्यामध्ये एकूण 3616 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.