45 वरील नागरिकांना लसीकरण सुरु : उप केंद्रे व सुट्टीदिवशी देखील लसीकरण
प्रतिनिधी / सातारा
जिल्हय़ात सुरु असलेल्या लसीकरणास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला असून आतापर्यंत दीड लाखाच्यावर नागरिकांना लसीकरण करण्यात आलेय. आता 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास गुरुवारपासून आरंभ झाला आहे. लसीचा तुटवडा आल्याने गेले दोन, तीन दिवस लसीकरणाचा वेग मंदावला होता. मात्र, गुरुवारीच लसीचे 59 हजार डोस आले आहे. त्यामुळे लसीकरण गतीने होणार असून आता सुट्टीबरोबरच सर्व आरोग्य उपकेंद्रांवर लस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.
गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्हय़ाला मिळणारा लसीचा साठा आला नव्हता. त्यामुळे लसीकरणाची गती कमी झाली होती. मात्र, गुरुवारीच जिल्हय़ासाठी 59 हजार लसींचा साठा उपलब्ध झाला असून आणखीन लसीची मागणी करण्यात आली असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले. केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे गुरुवार दि. 1 एप्रिलपासून जिल्हय़ात 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे काम सुरु झाले आहे.
जिल्हय़ातील 45 वर्षांवरील सर्वांना लस तातडीने मिळावी यासाठी आता सोमवारपासून जिल्हय़ातील सर्व आरोग्य उपकेंद्रांमध्ये लस देण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय तसेच काही खासगी ठिकाणी लसीकरण बुथ निर्माण करण्यात आलेले असून दुसरा डोस देण्याचे कामही गतीने सुरु झाले असल्याचे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.
‘जम्बो’त व्हेंटिलेटर वाढवण्याची गरज
मार्च महिन्याच्या मध्यानंतर जिल्हा बाधित वाढीचा आलेख चांगलाच वाढू लागलाय. जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटल्स व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण 288 बेड असून त्यापैकी सध्या 244 बेड उपलब्ध आहेत. त्यामध्ये 52 बेड आयसीयू आहेत. मात्र, व्हेंटेलेटर 18 च उपलब्ध असल्याने सध्या पॅनिक वातावरण झाले आहे. जम्बो कोव्हिड रुग्णालयात त्यामुळे सध्या रुग्ण दाखल करुन घेताना स्थितीनुसार रुग्ण दाखल करुन घेण्याची वेळ आलीय.
प्रधानमंत्री योजनेतून 20 लोकल व्हेंटेलेटर खरेदी करण्यात आले होते. मात्र, ते बंद पडत असल्याने त्याचा उपयोग उपचार होत नाही. त्यामुळे सध्या आयसीयूत असलेले 18 व्हेंटेलेटर 52 बेडवर आवश्यकतेनुसार आलटून पालटून वापरण्याची वेळ आलीय. त्यामुळे तिथे बाधित रुग्ण दाखल करुन घेताना अडचणी येवू लागल्या असून काही रुग्णांना मग खासगी रुग्णालयांचा सहारा घेण्याची वेळ आलीय. मात्र, ती त्यांना न परडवणारी आहे. दरम्यान, जिल्हा कोव्हिड रुग्णालयात बिघडलेल्या अवस्थेतील असलेले 20 व्हेंटेलेटर दुरुस्त करण्यासाठी गुरुवारी तंत्रज्ञ बोलावण्यात आले होते. त्यांचे काम सुरु होते. मात्र, व्हेंटेलेटर नसल्याने स्थिती गंभीर असल्याने मॅनेजमेंटकडून तातडीने हालचाली सुरु करण्यात आल्या असून आणखी व्हेंटेलेटरची मागणी करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱयांसमवेत तातडीची बैठक
दरम्यान, जिल्हा जम्बो कोव्हिड रुग्णालयात उद्भभवलेल्या स्थितीबाबत मॅनेजमेंटने तातडीने जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. या स्थितीवर तातडीने उपाय योजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी गुरुवारी संबंधित मॅनेजमेंटसह तातडीने बैठक घेतली. व्हेंटेलेटरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
आवश्यकता असेल त्यांनाच व्हेंटेलेटर
सध्या बाधित रुग्ण कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी येण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. मात्र, रुग्ण दाखल करुन घेताना त्याची सर्व तपासणी करुन त्यांना दाखल करुन घेण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. ज्यांना तीव्र लक्षणे नाहीत अशा रुग्णांनी पॅनिक न होता. होम आयसोलेट व्हावे. उगाच बेड उडवून ज्या रुग्णांना खरी गरज आहे त्यांना व्हेंटेलेटर सुविधा मिळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कोव्हिड रुग्णालय मॅनेजमेंटकडून करण्यात आलेय.
सर्वांनी लस घेण्याचे आवाहन
जिल्हय़ात 45 वर्षांवरील सर्वांना शासकीय ठिकाणी मोफत व खासगी केंद्रांवर 250 रुपये शुल्क आकारुन लस देण्याचे काम गुरुवारपासून सुरु झालेले आहे. लसीचा काही साठा उपलब्ध झाल्याने आता सध्या तरी कमतरता नाही. लवकरच आणखी लसीचा साठाही उपलब्ध होईल. यासाठी प्रशासन पाठपुरावा करत असून दुसरा डोस घेणाऱयांसह 45 वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी.
–डॉ. अनिरुध्द आठल्ये. जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा