आमदार वैभव नाईक यांची माहिती
प्रतिनिधी / कणकवली:
कोविड लसीकरणाच्या दुसऱया डोससाठी जिल्हय़ाला ज्यादा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यांच्या मागणीनुसार दुसऱया डोससाठी पुन्हा एकदा जिल्हय़ाला 21 हजार कोविड लसी देण्यात आल्या आहेत. यामध्ये कोविशिल्डच्या 15 हजार व कोवॅक्सीनच्या 6 हजार लसी उपलब्ध झाल्या असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
गणेशचतुर्थी हा सण काही दिवसांवर असून सिंधुदुर्ग जिल्हय़ात बहुसंख्येने चाकरमानी दाखल होतात. परंतु, कोरोनाचे संकट कायम असल्याने लसीकरण होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लसीकरणाच्या दुसऱया डोसची जिल्हय़ात कमतरता भासत असल्याने वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ज्यादा लसींची मागणी केली होती. त्यानुसार मागील आठवडय़ात सिंधुदुर्गसाठी 20 हजार कोविड लसींचा पुरवठा करण्यात आला होता. आज जिल्हय़ासाठी 21 हजार कोविड लसी पुरविण्यात आल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हय़ात 100 टक्के लसीकरण करण्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भर असून पुढील टप्प्यात जिल्हय़ासाठी 50 हजार कोविड लस देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.