वार्ताहर / टाळसुरे
दापोली तालुक्यातील विसापूर-सोवेलीदरम्यान असणाऱ्या सोवेली विन्हे खिंड येथील रोडनजीक 5 गावठी जिवंत बॉम्ब सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. कोणता घातपात करण्याच्या दृष्टीने बॉम्बची पेरणी केली होती की शिकार करण्याच्या दृष्टीने बॉम्ब ठेवण्यात आले होते, याचा तपास करण्याचे आव्हान दापोली पोलिसांसमोर आहे. रत्नागिरी येथून तातडीने श्वानपथक तसेच बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्ब शोध व नाश पथकाला दापोलीत प्राचारण करण्यात आले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दापोली पोलीस ‘अलर्ट’ मोडवर आल्याचे दिसून येत आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली पोलीस स्थानकाला गुप्त माहितीच्या आधारे स्फोटके पेरली असल्याचे समजले. त्या आधारे दापोली येथील विसापूर ते महाड रस्त्यावर सोवेली विन्हे खिंड येथील रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या गेल कंपनीच्या फलकाजवळ जंगलाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत झाडी व गवतात हे 5 गावठीसदृश बॉम्ब ठेवल्याचे आढळले.
गुप्त माहितीच्या आधारे दापोली पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर असे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. सोवेली विन्हे खिंड येथे साधारणत: सुपारीच्या आकाराचे पिवळ्dया रंगाचे सुतळी दोरा गुंडाळलेल्या स्थितीतील या बॉम्बसदृश वस्तू दिसल्या. त्यानंतर घटनास्थळी आढळलेल्या वस्तू बॉम्ब आहेत का, याची खात्री करण्यासाठी परिसराची पाहणी करण्यासाठी बॉम्बशोध व नाश पथक, रत्नागिरी यांना तातडीने बोलावण्यात आले. हा बॉम्ब शोध व नाश पथक येईपर्यंत संपूर्ण परिसर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलीस पथकाने उचलली. रत्नागिरी येथून पथक दापोली येथे पोहचल्यानंतर श्वानाच्या सहाय्याने ही वस्तू स्फोटकसदृश आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. श्वान रक याने वास घेऊन जमिनीवर बसून ही वस्तू स्फोटक असल्याचा इशारा दिला.
डग हॅण्डलर पोलीस नाईक अमोल गमरे यांनी हे पदार्थ स्फोटक असल्याची तपासणी करून हे गावठी बॉम्बसारखे असल्याचे सांगितले. या जंगलमय परिसरात अज्ञात इसमाने ठेवलेले या स्फोटक वस्तू मानवी जीविताला तसेच प्राण्यांच्या जीवितास धोका होईल, अशारितीने ठेवल्याचे आढळले आहे. दापोली पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविऊद्ध तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. दापोली परिसरात अशाप्रकारे जिवंत गावठी बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे.
दापोली पोलिसांसमोर आव्हान
सध्या शिमग्याचा उत्सव सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी शिकारीसाठीही अशा प्रकारच्या स्फोटकांचा उपयोग केला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही स्फोटके कशासाठी ठेवण्यात आली आहेत, याचा शोध घेण्याचे आव्हान दापोली पोलिसांच्या समोर उभे ठाकले आहे.