गौंडवाड येथील मृत सतीशच्या पत्नीची आर्त हाक : आई, बहिणीसह नातेवाईकांना दुःख अनावर
प्रतिनिधी /बेळगाव
“त्यांना भेटवा… गाव जे म्हणेल ते सगळे ऐकते… त्यांनी जेवले नसतील तर मी कसे जेवू…. त्यांनी येऊ देत… दोघे मिळून जेवू. तोपर्यंत पाणी पण घेणार नाही, जबरदस्ती करू नका’’, असे म्हणत पती सतीशच्या नावाने हंबरडा फोडणारी त्याची पत्नी पूजा यांचे सांत्वन कोणत्या शब्दात करावे? हे गावातील महिलांना, पोलिसांना आणि पत्रकारांनाही कळत नव्हते.
गौंडवाड येथे सतीश राजेंद्र पाटील याच्या खुनानंतर गावात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. हे सर्व प्रकार होत असताना गंभीर जखमी झालेल्या सतीश पाटील याचा इस्पितळात नेण्याच्या वाटेवरच मृत्यू झाल्याचे वृत्त गावात पसरले आणि गावातील जमाव संतप्त झाला.
मात्र, यापैकी कोणत्याच घटनेची माहिती सतीशच्या पत्नी पूजा यांना नव्हती. सतीशला हॉस्पिटलमध्ये नेल्याचे त्यांना माहीत होते. मात्र, दोन लहानग्या मुलांसमवेत त्या घरीच राहिल्या. तर सतीशच्या आई त्याच्या बहिणीच्या गावी म्हणजेच विशाखापट्टण येथे गेल्या होत्या. सतीशचे वडील पूजा यांच्यासमवेत घरीच होते. रात्री ही घटना घडल्यापासून पूजा यांनी सतीशच्या नावाचा धोशा सुरू केला होता. गावातील सर्व महिला सकाळी हॉस्पिटलपर्यंत जाऊन आल्या. त्या आल्यानंतरही त्यांनी पूजा यांना सतीश या जगात नसल्याचे समजू दिले नाही.
सर्वांनाच अश्रू अनावर
दुपारी 3.30 च्या दरम्यान सतीशची आई, बहीण गौंडवाड येथे पोहोचल्या. दरम्यान, सतीशचा मृतदेह आल्यानंतरच आपल्या पतीची साथ सुटल्याचे वास्तव पूजा यांना कळाले आणि त्यांच्या आक्रोशाला, दुःखाला पारावार राहिला नाही. दुपारपर्यंत स्नेहासोबत असलेल्या महिलांनी आपले अश्रू रोखून धरले होते. त्यांनाही स्वतःला आवरणे अशक्मय झाले.
गावातील महिलांनी दिलेल्या वृत्तानुसार दर शनिवारी गावातील मुले सतीशच्या पुढाकाराने काळभैरवनाथ मंदिराची स्वच्छता करतात आणि रविवारी पूजा करतात. त्याच ठिकाणी पार्क केलेल्या गाडीचे निमित्त होऊन वादाची ठिणगी पडली आणि त्यामध्ये सतीशचा नाहक बळी गेला. दरम्यान, शनिवारी रात्रीच गावामध्ये महिला मंडळाने बचत गट सुरू करण्याच्या दृष्टीने सभा घेतली होती. गावातील देवस्थानच्या जागेवरून सुरू असलेला वाद लवकर संपवावा, यासाठी देवस्की पंच बोलावून ग्राम पंचायत आणि पोलीस स्थानकाला अर्ज द्यायचा, असे महिलांनी ठरविले होते. दरम्यान, ही सभा सुरू असतानाच गाडी पार्क करण्यावरून वाद होऊन प्रकरण हातघाईवर गेले आणि त्यातच सतीशचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पूजा, सतीशच्या आई, बहीण आणि नातेवाईक यांना कोणालाच हा धक्का सहन झालेला नाही. मात्र, पूजा यांचे सांत्वन करण्यासाठी कोणाकडेच शब्द नव्हते. त्यांचा आकांत पाहावत नव्हता.
कोरोनाकाळात सतीशची अनेक रुग्णांना मदत
सतीशने कोरोनाकाळात अनेक रुग्णांना मदत करून दिलासा दिला होता. कलावती आईंचा तो निस्सीम भक्त होता. गावात आणि बाहेरही त्याचा बराच मोठा मित्रपरिवार होता. गौंडवाड गावात नव्याने उदयास येणारे नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. सतीश स्वतः मेडिकल रिपेझेंटेटिव्ह होता आणि त्याचे स्वतःचे बॉक्साईट रोड येथे औषधाचे दुकानही होते. हे दुकान पूजा चालवत होत्या. दोन मुलांसह पूजा व सतीश यांनी आपल्या संसाराची अनेक स्वप्ने पाहिली होती. ज्याच्या आठवणीने पूजा वारंवार उन्मळून पडत होत्या.