लोकप्रतिनिधीं स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात दंग
प्रतिनिधी/ सातारा
आमदार निलेश लंके यांनी त्यांच्या मतदार संघातल्या कोरोना बाधित रुग्णांनाच नाही तर बाहेरच्या जिह्यातून आलेल्या रुग्णांनाही सेवा दिली. त्याच अनुषंगाने सातारा जिह्याच्या दौऱयावर ऑफलाईन बैठक घ्यायला आलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसमोर पत्रकारांनी प्रश्न केला तो जिह्यातील आमदार निलेश लंके कोण?, याच प्रश्नांवरुन जे ते आमदार आता स्वतःचीच पाठ थोपटून घेवू लागल्याचे चित्र आहे तर त्यांचे विरोधक त्यांनी केलेला दावा कसा फोल हे दाखवून देत आहेत. एकमेकांची उणीदुणी काढण्याचा कार्यक्रम सुरु झालेला आहे. अजितदादांच्या दौऱयानंतर राजकीय खिचडीचा कार्यक्रम जोरात सुरु आहे.
सातारा जिह्यात ज्या प्रमाणात लोकप्रतिनिधींकडून कामे व्हायला हवी आहेत ती होताना दिसत नाहीत. म्हणूनच पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजितदादांना साताऱयाचे आमदार नीलेश लंके कोण? असा प्रश्न छेडला होता. त्याच प्रश्नांवरुन जिह्यात सध्या वादळ सुरु झाले आहे. हे वादळ प्रत्येक मतदार संघात घोंघावते आहे. आठही विधानसभा मतदार संघातील आमदार हे आपण किती काम केले हे दाखवून देत आहेत. प्रत्यक्षात विरोधकच त्यांची सोशल मीडियावर भांडाफोड करताना दिसत आहेत. त्यामध्ये कोणताही मतदार संघ यातून सुटलेला नाही. सातारा-जावली असेल किंवा वाई खंडाळा महाबळेश्वर असेल, फलटण असेल किंवा माण-खटाव असेल, किंवा कोरेगाव असेल किंवा पाटण, कराड दक्षिण असेल. अगदी मंत्र्यांच्याही मतदार संघातील विरोधकांकडून सोशल मीडियावर टीप्पणी सुरु झाली आहे. लोकप्रतिनिधी काय सांगताहेत आणि खरी वस्तुस्थिती काय हे दाखवले जात आहे. त्यामुळे कोरोना काळात जिह्यात आमदार निलेश लंके कोण बनणार याचीच चढाओढ सुरु आहे. परंतु अद्यापपर्यंत जिल्हय़ात आमदार निलेश लंके कोणीही बनू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आरोप प्रत्यारोप मात्र चांगलेच गाजू लागले आहेत. अजितदादांच्या दौऱयानंतर ही वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.