जिल्हा पोलीस प्रमुखांची नवीन वर्षातील मोठी कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यातील लोणंद पोलीस ठाणे व उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खून, दरोडा, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱया दोन टोळीतील सदस्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी तडीपार केले आहे. नवीन वर्षातील पोलीस अधीक्षकांची ही मोठी कारवाई आहे.
लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्हे दाखल असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख राकेश/सोन्या भगवान भंडलकर(वय 21, रा. तांबवे ता. फलटण), सौरभ संजय जगताप(वय 21, रा. सालपे ता. फलटण) याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे केला होता. या प्रस्तावानुसार या टोळीस दोन वर्षाकरीता सातारा, पुणे व सोलापूर या तीन जिह्यातून हद्दपार केले आहे.
असाच तडीपारीचा प्रस्ताव उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलीस अधीक्षकांपुढे सादर केला होता. या प्रस्तावानुसार टोळीप्रमुख अक्षय शंकर पाटोळे(वय 23, रा. पाटोळेवस्ती शिरसवडी ता. खटाव), राहूल चंद्रकांत जाधव (वय 21, रा. मसूर ता. कराड), शरद संजय चव्हाण (वय 21, रा. मसुर ता. कराड), प्रसाद श्रीरंग जाधव (वय 20, रा. रा. मसुर ता. कराड) यांना एका वर्षाकरीता सातारा, सांगली या दोन जिह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक बन्सल यांनी पदभार स्विकारल्यापासून हद्दपारीचे 39 प्रस्तावामध्ये 98 उपद्रवी लोकांना सातारा जिल्हा व लगतच्या जिह्यातील तालुक्यांमधून हद्दपारीचे आदेश केले आहेत.