खंडळ्यात 85 टक्के मतदान ; एकूण 265 उमेदवारांचे नशिब मशीनमध्ये बंद ; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ातील कोरेगांव, खंडाळा दहिवडी, वडूज, लोणंद व पाटण या सहा नगरपंचायतींसाठीचे मतदान मंगळवारी पार पडले. शासकीय यंत्रणेच्या बंदोबस्तामध्ये एकूण 265 उमेदवारांचे नशिब ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले आहेत. जिल्हय़ातील नगरपंचायतींची निवडणूक राजकीय पक्ष व स्थानिक आघाडय़ांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या आखाडय़ात दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढतीसाठीचे हे मतदान पार पडले.
यामध्ये लोणंद नगरपंचायतींमध्ये एकूण 13,314 मतदार होते, त्यापैकी एकूण 72.17 टक्के मतदान पार पडले. तसेच कोरेगावसाठी 15,366 मतदानापैकी एकूण 70 टक्के, पाटणमध्ये 7066 मतदानापैकी एकूण 74 टक्के, वडूजमध्ये 11,271 मतदानापैकी एकूण 65 टक्के खंडाळमध्ये 3815 मतदानापैकी एकूण 85 टक्के, व दहीवडीमध्ये 9,926 मतदानापैकी एकूण 80 टक्के मतदान पार पडले. एकंदरीत आकडेवारी पाहता सर्व मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढलेला दिसला.
मतदानासाठी कोरेगाव 26, खंडाळा 13, दहिवडी 17, वडूज 20, लोणंद 27, व पाटणला 13 मतदान केंद्रांवर सदरची मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सदरची मतदान प्रक्रिया पार पडली. प्रत्येक नगरपंचायतीत 17 एकसदस्यीय प्रभाग असून ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आधी प्रत्येक नगरपंचायतीत 17 एकसदस्यीय प्रभाग आहेत. सध्या ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आधी प्रत्येक नगरपंचायतीत चार जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी प्रत्येकी 13 जागांसाठी मतदान पार पडले. त्यामुळे एकूण 265 उमेदवरांचे भवितव्य मशीनमध्ये बंद झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरित प्रत्येकी चार जागांसाठी दि. 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. सर्व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजनी ही एकाच दिवशी दि. 19 जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यामुळे आता मतदान झाले असून सर्वाचेच लक्ष आता मतमोजनी आणि निकालाकडे लागले आहे.