प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सुरू असलेले कार्य सर्वोत्कृष्ट असून राज्यातील संघटना देखील सातारच्या पत्रकार संघटनेचे आदर्श घेतील तर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत मराठी पत्रकार परिषदेची सोशल मीडिया संघटनाही साताऱयात जोमाने काम करत असून जिह्यातील 70 पत्रकारांना अपघात विम्याचे संरक्षण देणारी राज्यातील पहिली सोशल मीडिया संघटना ठरली आहे, असे गौरवोद्गार मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाचे राज्याध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी साताऱयात आयोजित कार्यक्रमात काढले.
यावेळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी देखील सातारच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेत जिह्यातील सर्व पत्रकार मराठी पत्रकार परिषदेच्या छत्राखाली नेहमीच एकत्र येतात त्यामुळे सातारा जिह्यातील पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी या एकीचा आजवर फायदा झाला आहे असे मत व्यक्त करत लवकरच जिल्हाभर सोशल मीडिया संघटनेचा विस्तार देखील करू असे आश्वासन जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांनी बोलताना व्यक्त केले आहे
मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाच्या पत्रकारांच्या नावे काढण्यात आलेल्या 1 लाख रुपयांच्या विमा पॉलिसीचे राज्याध्यक्ष बापूसाहेब गोरे, जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे, खजिनदार प्रशांत जगताप, जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत जाधव, प्रतीक भद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.
प्रास्तविक मराठी पत्रकार परिषद सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे यांनी केले तर जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रशांत जाधव यांनी आभार मानले.
यावेळी पुणे दर्शनचे संपादक विश्वास शिंदे, पुणे दर्शनचे प्रतिनिधी अतुल वैराट, पिंपरी-चिंचवड सोशल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे, कोषाध्यक्ष सुनील कांबळे, कार्यकारिणी सदस्य जितेंद्र गवळी, गणेश शिंदे ,प्रशांत बाजी, सचिन मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.