प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने युद्धपातळीवर उपाय योजना करण्यास सुरूवात केली आहे. वाढत्या संशयित रूग्णांनावर उपचार करण्यासाठी अडीच हजार रूग्ण बसतील इतक्या क्षमतेचे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. प्राथमिक तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून शाळा, हॉस्पिटल, कॉलेजचाही वापर केला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूद्ध आठल्ये यांनी दिली.
जिह्यात कोरोनाचा आकडा 77 वर येवून पोहचला आहे. ही संख्या वाढु नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱयांची तपासणी करून त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जिह्यात सध्यातरी अडीज हजार रूग्ण बसतील इतकी कोरोना केअर सेंटर उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यांची प्राथमिक तयारी पूर्ण केली असून, प्रत्येक तालुक्यात याबाबत अशा वास्तू निश्चित करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात एक व कराड तालुक्यात तीन असे 14 कोरोना केअर सेंटर सुरू आहेत. आणखी 11 कोरोना केअर सेंटर लवकरच सुरू होणार आहेत. जिह्यात 25 कोरोना केअर सेंटर सुरू होतील. साधारण प्रत्येक सेंटरमध्ये 100 रूग्ण याप्रमाणे अडीच हजार रूग्णांवर एकाच वेळी उपचार करण्याची सोय केली जात आहे. सध्या कोरोनाचे रूग्ण कराड तालुक्यात सर्वाधिक असून, तेथे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत संपूर्ण जिह्यातील 700 लोक क्वारंटाइन केलेले आहेत. आगामी काळात संसर्ग वाढून रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. सातारा तालुक्यातील खावली येथे 200 रूग्ण क्षमतेचे कोरोना सेंटर असून त्यात 90 रूग्ण उपचार घेत आहेत. आणखी रूग्ण वाढल्यास सैनिक स्कूलचाही वापर केला जाणार आहे.