प्रतिनिधी / सांगली
सोमवारी जिह्यात नवीन 11 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिह्याची धाकधूक पुन्हा वाढत चालली आहे. पॉझिटिव्ह रूग्णसंख्येने 178 हा आकडा पार केला आहे. जरी एकूण रूग्णसंख्येचा आकडा वाढत चालला असला तरी रूग्ण बरे होण्याची संख्याही वाढत असून सोमवारी सहाजण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्या 72 झाली आहे.
पलूस येथील एकाच कुटुंबातील सहा तर मांगलेतील डॉक्टर बंधुंना लागण
पलूस येथे दोन दिवसांपूर्वी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील कुटुंबातील व्यक्तींना संस्था क्वारंटाईन करण्यात आले होते. या सर्वांचे स्वॅब घेतले असता त्यातील सहाजणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये दोन पुरूष तर चार महिला आहेत. शिराळा तालुक्यातील मांगले येथील एका खासगी डॉक्टरांचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरांचा मांगले येथे मध्यवस्तीत दवाखाना आहे. त्यांना व त्यांच्या बंधुंना डेंग्यूची लागण झाल्याने या दोघांच्यावर इस्लामपूर येथे उपचार सुरू होते. त्याचवेळी त्यांना त्रास होवू लागल्याने त्यांचा स्वॅब घेण्यात आला असता तो स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने या दोघांनाही मिरजेच्या कोरोना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीचा, मुलीचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातील इतरांना संस्था क्वारंटाईन केले असून त्यांचे अहवाल अद्यापही प्रतीक्षेत आहेत. जत येथील 50 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 72 वर्षीय महिलेलाही कोरोनाचा लागण झाली आहे. वाळवा तालुक्यातील येलूर येथील 65 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सहाजण कोरोनामुक्त
कोरोनाचा दहा दिवसांचा उपचार घेतल्यानंतर सहाजणांचे सोमवारी स्वॅब घेण्यात आले होते. या सहाही जणांचे स्वॅब निगेटिव्ह आल्याने हे सहाजण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामध्ये कडेगाव नेर्ली येथील 28 वर्षीय युवक, शिराळा खिरवडे येथील 52 वर्षीय महिला, तासगाव कचरेवाडी येथील 28 वर्षीय युवक, जत आवंढी येथील 29 आणि 27 वर्षीय युवक, मिरज दत्त कॉलनी येथील 67 वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे. या सर्वांना आता संस्था क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
दोघांची प्रकृती अद्यापही चिंताजनकच
सध्या उपचारात असलेल्या सहा रूग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील 56 वर्षीय व्यक्ती, विटा-हनुमंतनगर येथील 34 वर्षीय युवक या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील 60 वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 81 वर्षीय आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील कदमवाडी येथील 50 वर्षांची महिला तसेच नांगोळे (मूळ गाव कडेबिसरी, ता. सांगोला.) येथील 48 वर्षीय व्यक्ती यांची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाची जिह्यातील स्थिती
एकूण रूग्ण 178
बरे झालेले 99
उपचारात 72
मयत 07