प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सातारा शहरासह जिल्हा बंद होता. काल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नॉन रेड झोननुसार आदेश काढण्यात आला.त्या आदेशानुसार सातारा शहरातील बहुतांशी दुकाने दुकान मालकांनी सकाळी 10 वाजता भीत भीत उघडली.शहरातील जे रस्ते बंद करण्यात आले होते ते रस्ते सातारा प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांनी सुरू ठेवण्याचे आदेश दिले.तसे आदेश त्यांनी दुपारी काढले आहेत.त्यामुळे ते रस्ते खुले झाले आहेत.शहरात सोने चांदीची दुकाने उद्यापासून सुरू होणार आहेत.हॉटेल बंदच असून पार्सलच्या ऑर्डर स्वीकारल्या जात असल्या तरी ही डिलिव्हरी करण्यासाठी कामगार नसल्याने गैरसोय होत होती. एसटी बसेस सुरू केल्या असल्या तरीही कोरोनाच्या भीतीमुळे त्या रिकाम्याच धावत होत्या.सातारा शहरासह जिह्यातील पाचगणी, महाबळेश्वर, वाई, कराड, फलटण आदी महत्वाची शहरातले व्यवहार हळूहळू सुरू होत असल्याचे चित्र दिसत होते.
पहिला लॉकडाऊन दि.22मार्च ला जाहीर झाला.तेव्हापासून सातारा जिह्यातील प्रमुख शहरे लगेच लॉक डाऊन झाली.दुकानांना लावलेली शटरचे कुलूप उघडले गेले नाही. सातारा व कराड या दोन शहरात कडक लॉक डाऊन होता.ज्या भागात रुग्ण आढळून आले त्या भागासह संपूर्ण शहर सुरुवातीला कंटेंटमेंट झोन करण्यात आले होते.शासनाच्या बदलत्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह हे निर्णय घेत होते.गुरुवारी त्यांनी लॉकडाऊन काही अंशी शिथिल करण्याबाबत अधिसूचना जारी केली.त्यानुसार सातारा शहरासह जिह्यातील व्यवहार दबकत दबकत सुरू होताना दिसत होते.सकाळी उशिरा माहिती घेऊन बाजूच्या दुकानदाराने दुकान उघडले आहे हे पाहून दुकाने उघडत असल्याचे चित्र दिसत होते.हळूहळू व्यवहार पूर्वपदावर येत असल्याचे जाणवत होते.सातारा शहरातील काही दुकान मालकांनी अजून डोक्याला झंझट नको म्हणून आपले दुकान उघडले नव्हते.
हॉटेलमध्ये किचन सुरू पण डिलिव्हरी बॉयचे वांदे
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार शहरातली हॉटेलमध्ये भट्टी तब्बल 56 दिवसांनी सुरू झाली.किचन सुरू झाले.हॉटेलमध्ये कामगार नसल्याने काही हॉटेलमध्ये पार्सल सुविधा स्वीकारली जात नव्हती तर ज्यांच्याकडे स्वीकारली जात होती त्यांच्याकडे ते पार्सल पोहचवण्यासाठी डिलिव्हरी बॉय नसल्याने गैरसोय होत होती.
दुकान उघडताच उंदराचा प्रताप दुकान मालकांच्या निदर्शनास
तब्बल दोन महिन्यांनी सातारा शहरातल्या दुकानांचे टाळे खोलण्यात आले.दुकानांचे टाळे दुकान मालकांनी भीत भीतच उघडले.प्रशासन कारवाई करेल या भीतीपोटी उशिरा पोवई नाका,मोती चौक, राजवाडा परिसर,बसस्थानक येथील दुकाने उघडली जात होती.जेव्हा शटर उघडले जात होते तेव्हा मात्र, दुकानांमध्ये उंदीर, घुशी यांनी आतील साहित्याची नासधूस केल्याचे निदर्शनास येत होते.ती साफसफाई करणायत दुकानदार व्यस्त होते.मुख्य बाजारपेठ हळुहळु सावरत असल्याचे चित्र होते.
रिक्षा थांब्यावर दिसली रिक्षा
जिल्हाधिकारी यांच्या परिपत्रकानुसार रिक्षा शहरात सुरू झाल्याचे दिसत होते.दारात उभी केलेली रिक्षा चालक सर्व काळजी घेऊन आपली रिक्षा घेऊन उभा असल्याचे दिसत होते.भले रिक्षात कोणी प्रवासी बसत नसले तरी काही रिक्षा थांब्यावर रिक्षा उभ्या असल्याचे चित्र दिसत होते.
एसटी बसेस रिकाम्याच पळत
जरी जिल्हाधिकारी यांनी काही नियम टाकून एसटी बसेस सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी सुरू झालेल्या बसेस या मोकळाच धावताना दिसत होत्या.वाहक-चालक हे डय़ुटीवर यायला धजावत होते.सातारा शहरातील राजवाडा बसस्थानकावर काहीच गर्दी नव्हती.सातारा मुख्य बसस्थानकात ही मोजकेच कर्मचारी दिसत होते.कोरोनाच्या भीती पोटी अनेकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे दिसत होते.
ते रस्ते झाले खुले
सातारा शहरात अगोदरच असलेल्या तीन रस्त्याची कोंडी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार बंद ठेवण्यात आल्याचा अनुभव सातारकर नागरिकांनी घेतला आहे.त्यात प्रामुख्याने शहरातील पोवई नाका ते शाहू चौक, शाहू चौक ते मोती चौक, शाहू चौक ते समर्थ मंदिर, बस स्थानक ते तहसीलदार कार्यलय हे रस्ते सुरू करण्यात आले होते.
प्रांत मिनाज मुल्ला यांनी दुपारी काढला आदेश
सातारा शहरात कंटेंटमेंट झोन, मायक्रो कंटेंटमेंट झोन याकरता जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार शहरातल्या सदरबजार, गार्डन सिटी, प्रतापगंज पेठ, कारागृह, गेंडामाळ, कोडोली हे कंटेंटमेंट झोन वगळून शहरातील पोवई नाका ते पालिका रस्ता, पालिका रस्ता ते राजवाडा, पोवई नाका ते शाहू स्टेडियम, एसटी स्टँड ते राधिका चौक, पोवई नाका ते पोलीस मुख्यालय मार्ग मोती चौक या रस्त्याकडेची अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील, इतर दुकाने बंद राहतील असा आदेश काढण्यात आला आहे.त्यामध्ये किराणा, औषधे, दूध, फळे,पेट्रोल पंप ही दुकाने सुरू राहतील इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सुरू राहील असे म्हटले आहे.
कापड दुकानदारांची घाई गडबड
सातारा शहरात कापड दुकाने प्रामुख्याने सदाशिवपेठ खण आळी या भागात आहेत.दोन महिने दुकाने बंद असल्याने उंदीर, घुशी यांनी कापड मालाचे नुकसान करू नये याची दुकानदारानी नियमितपणे काळजी घेतली असली तरी काही दुकानदाराना आपल्या मालाचे नुकसान झाले नाही ना यासाठी दुकान उघडण्याची घाई करतानाचे चित्र दिसत होते.काही दुकानदारांनी तर उंदीर टाळण्यासाठी त्यांना पिण्याच्या पाण्याचे भांडे अन खाऊ दुकानाबाहेर ठेवण्यात आल्याचे काही दुकानदारानी सांगितले.
उपनगरात व्यापायांची गडबड
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आपण दुकान उघडावे की नको या विचारात शहरालगतच्या शाहूपुरी, शाहूनगर, गोडोली या भागांतील व्यापारी दिसत होते.एकदा दुकांने उघडल्यावर त्यांची दुकानात स्वच्छता करण्यामध्ये गडबड दिसत होती.तरीही पोलीस कधी ही येतील अन कारवाई करतील याची भोती असल्याने काहींनी अर्धेच शटर उघडले होते.मोळाचा ओढा परिसरात बांधकाम साहित्य विक्रीची दुकाने मात्र सुरू असली तरी कामगार नसल्याने तेथे ही व्यवहार मंद गतीने सुरू असल्याचे दिसत होते.