रोहयोअंतर्गत घेण्यात आलेली कामे तसेच नेसरगी येथील गोडावूनला भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे तसेच नेसरगी येथील सोयाबीन बियाणे गोडावूनची जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी शनिवारी पाहणी केली. नेसरगी जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रात त्यांनी पाहणी दौरा केला. यावेळी नेसरगीसह मेकलमर्डी, वण्णूर, हणबरहट्टी आणि मल्लापूर येथे रोजगार हमी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. ग्राम पंचायतीच्या कार्यालयांना भेटी देऊन आवश्यक सूचना केल्या.
नरेगाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या जलामृत योजनेच्या कामाची पाहणी करून कृती आराखडय़ाची माहिती घेऊन अधिकारीवर्गास सूचना केली. नरेगाअंतर्गत कामे करणाऱया मजुरांना मास्कचा वापर करण्याची तसेच सोशल डिस्टन्स पाळण्याची सूचना केली. यावेळी रस्त्याशेजारी भाजी विक्रेत्या महिलांना अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी मास्कचे वितरण केले. नेसरगी येथील सोयाबीन बियाणे गोडावूनला भेट देऊन माहिती जाणून घेतली. या भागात सोयाबीन पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. मात्र, लॉकडाऊनमुळे मध्यप्रदेश व बिहार येथून येणाऱया बियाणांची वाहतूक थांबली आहे. त्यामुळे शेतकऱयांना बियाणांची विक्री करण्यात आली नाही. मात्र, या भागातील शेतकऱयांनी उपलब्ध बियाणे वितरित करण्याची मागणी केली आहे. पावसाळय़ापूर्वीच बियाणे दिल्यास उपयोगी ठरणार असल्याचे शेतकरीवर्गांनी यावेळी सांगितले. यासंबंधी अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृषी खात्याच्या संचालकांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.
अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्यासह कृषी अधिकारी कळसप्पन्नावर, जि. पं. सदस्य निंगप्पा अरकेरी, नेसरगी ग्रा. पं. अध्यक्ष सत्तार मोकाशी, वण्णूर ता. पं. सदस्या व्हळेव्वा नडवीनमनी, हणबरहट्टी ता. पं. सदस्या लक्ष्मी तलवार यांच्यासह संबंधित ग्रा. पं. पीडीओ उपस्थित होते.