प्रतिनिधी/ पणजी
विरोधी पक्षांना पूर्णपणे निष्प्रभ करण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपने केल्यानंतरही राज्यातील अनेक मतदारसंघांत विरोधी पक्षांनी आक्रमक प्रचार केल्याने आणि त्यातच भाजपांतर्गत आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नसलेल्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केल्याच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला अंतर्गत दगाफटका होऊ नये याकरिता युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागत आहेत. उद्या शनिवारी होणाऱया जिल्हा पंचायत निवडणुकीत पुन्हा सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजपला सध्या निकराची झुंज द्यावी लागत आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीत गोव्यातील ग्रामीण भागातील मतदार मतदानात सहभागी होणार आहेत. गोव्याच्या एकूण मतदारसंख्येपैकी दोन तृतियांश मतदार हे या निवडणुकीत मतदान करू शकतात. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी गेला महिनाभर भाजपने आपली प्रचार यंत्रणा राबविलेली आहे. पक्षीय पातळीवर भाजपएवढी यंत्रणा कोणत्याही पक्षाची नाही.
विरोधक गाफील… तरीही भाजपची निकराची झुंज
विरोधी पक्षाची नेतेमंडळी पूर्णपणे गाफील राहिली असली तरीही सध्याच्या परिस्थितीत भाजपला निकराची झुंज द्यावी लागणार आहे. सत्ताधारी पक्षांतर्गत दोन मतप्रवाह आहेत. त्याचा दगाफटका भाजपला बसण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपने आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत. भाजपने घरोघरी प्रचारावर जसा भर दिलेला आहे तसाच आता विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी देखील संयुक्तपणे प्रचार सुरू केलेला आहे.
पेडणेमध्ये उपमुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा लागलीय पणाला
भाजपला सध्या मगोपासून जास्त भीती निर्माण झाली आहे. मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी पेडणेतील चारही मतदारसंघांत विजय संपादन करू असे म्हटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनीदेखील चारही मतदारसंघांत भाजपच विजयी होणार असा दावा केला आहे. पेडणेमध्ये उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बार्देशात सत्ताधारा भाजपांतर्गत दोन प्रवाह
बार्देशमध्ये सत्ताधारी दोन प्रवाह आहेत. भाजपला बार्देशमध्ये निकराची झुंज द्यावी लागेल. मंत्री मायकल लोबो आणि आमदार जयेश साळगावकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्याचबरोबर कोलवाळ, हळदोणे व शिरसईमध्ये प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
डिचोली तालुक्यातील मये भाजपमध्ये दोन मतप्रवाह आहेत. कारापूर सर्वणमध्येही दोन मतप्रवाह आहेत. या मतदारसंघात कुडणे पंचातीचा समावेश आहे. पाळीमध्ये तिरंगी थेट लढत आहे. डॉ. प्रमोद सावंत यांचे या मतदारसंघात जास्त लक्ष आहे.
सत्तरीत भाजपला यश मिळण्याची शक्यता
सत्तरीत भाजपला यश मिळू शकते. परंतु मेळावली प्रकरण, माडकर प्रकरण ताजे असल्याने त्याचा नेमका कितपत फरक पडतो हे 14 रोजी कळून येईल. परंतु, ही निवडणूक भाजपला सत्तरीत थोडीफार अडचणीची ठरलेली आहे.
दक्षिण गोव्यात भाजपच्या मनात अद्याप धाकधुक आहे. भाजपने जोरदार फिल्डींग लावलेली असली तरीदेखील काँग्रेसच्या अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पैंगीणमध्ये भाजपविरुद्ध काँग्रेस, बेतकी खांडोळामध्ये तिरंगी लढत, शिरोडय़ात पुन्हा मगोविरुद्ध भाजप, अपक्ष आणि आपनेही आव्हान दिले आहे. कुर्टीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी भाजपने फिल्डींग लावतानाच काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत. सावर्डेमध्ये चौरंगी लढत मगोने भाजपसमोर आव्हान निर्माण केले आहे.
रिवण मतदारसंघात अटीतटीची लढत
सालसेतमधील मतदारसंघांवर विरोधकांचा कब्जा आहे. भाजपने नुवे, कोलवा, कुडतरी, वेळ्ळी, राय, बाणावली या मतदारसंघांत उमेदवार उभे केलेले नाहीत. दक्षिण गोव्यातील रिवण मतदारसंघात अटीतटीची लढत असून भाजपमधील दोन ते तीन मतप्रवाह एकमेकांच्या विरोधात आहेत. इथेही मगोने भाजपला आव्हान दिले आहे. काँग्रेस पक्षही या मतदारसंघात सक्रिय आहे तर अपक्ष आमदारालादेखील हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा आहे. सत्ताधारी भाजपसमोर मगोने व काँग्रेसने आव्हान निर्माण केले आहे.
जिल्हा पंचायत … विधानसभेची ‘सेमी फायनल’
जिल्हा पंचायत निवडणुकीचा प्रभाव आगामी राजकारणावर होणार असल्याने विधानसभेसाठी उपान्त्य फेरी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. यावेळी सत्ताधारी भाजपला निकराचा संघर्ष करावा लागत आहे. ही निवडणूक सत्ताधाऱयांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे भाजपने अंतर्गत हालचाली सुरुवारी सुरू केल्या आहेत. आजही भाजप बऱयाच हालचाली सुरू करील असा अंदाज आहे. विरोधी पक्ष गाफील राहिलेला होता. मात्र अचानक दोन दिवसांपासून विरोधकांनी आक्रमक पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. या निवडणुकीत सर्वांनाच विषय प्रतिष्ठेचा बनलेला आहे. काँग्रेसकरिता ही निवडणूक अस्तित्वासाठीची लढाई ठरली आहे.