प्रतिनिधी/ रत्नागिरी
सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची माळ संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गटाचे सर्वात तरुण सदस्य रोहन बने यांच्या गळय़ात पडली आहे. उपाध्यक्षपदी गुहागरचे महेश नाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी पार पडली. या पदासाठी अनुभवाला प्राधान्य मिळते की नव्या नेतृत्वाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले होते. या शर्यतीत 5 वेळा प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ सदस्य उदय बने, संगमेश्वरचे रोहन बने, रत्नागिरीचे महेश म्हाप, खेडचे अण्णा कदम, चिपळूणचे बाळशेठ जाधव यांची नावे आघाडीवर होती. मंगळवारी सायंकाळपर्यंत याबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम होता.
बुधवारी सकाळी शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली टिआरपी येथील जि.प.अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गटाचे प्रतिनिधीत्व करणारे रोहन बने यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षपदासाठी रोहन बने तर उपाध्यक्षपदासाठी महेश नाटेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्याकडे अर्ज सादर केले. अंतिम मुदतीपर्यंत अन्य कोणत्याही सदस्याने अर्ज सादर न केल्याने बने व नाटेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे उपस्थित होते.
संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने यांचे रोहन हे सुपुत्र होत. सुभाष बने यांनीही यापुर्वी जि. प. अध्यक्ष व विरोधी गटनेते म्हणून काम केले आहे. रोहन यांच्या निवडीने संगमेश्वर तालुक्याला बहुमान मिळाल्याने सेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
जिल्हा नियोजन समिती सदस्य व सभापतीपद भूषविलेल्या सदस्यांना अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी संधी दिली जाणार नसल्याचे यापुर्वीच पक्षाने स्पष्ट केले होते. रत्नागिरी विधानसभा मतदार संघाला यापुर्वी अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने उदय बने तसेच महेश म्हाप यांची नावे बाजूला पडली. मात्र सभापतीपदासाठी महेश उर्फ बाबू म्हाप व परशुराम कदम यांची नावे अग्रक्रमाने घेतली जात आहेत.
या निवड प्रक्रियेवेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, आमदार राजन साळवी, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत, मावळत्या जि. प. अध्यक्ष स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे, अण्णा कदम, संतोष थेराडे, नेहा माने, नगराध्यक्ष बंडय़ा साळवी, माजी जि.प.अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत
देवरूखात जल्लोष
जिल्हा परिषद अध्यक्षपदी रोहन बने यांची निवड झाल्याबद्दल देवरुखात नाक्यानाक्यावर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. रोहन यांचा वाढदिवस नुकताच 28 डिसेंबर रोजी साजरा झाला. यावेळी आमदार उदय सामंत यांनी या वाढदिवसाला उपस्थित राहून रोहन याला शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचवेळी रोहन बने यांचे नाव निश्चित होणार असे बोलले जात होते. रोहन यांच्या निवडी प्रित्यर्थ देवरुखात मिरवणुक काढण्यात आली.