देवगड पं. स. शिक्षण विभाग घोटाळा प्रकरण : मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची कारवाई
प्रतिनिधी / देवगड:
देवगड पंचायत समिती शिक्षण विभागात करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले लिपिक गंगाधर बापण्णा अल्लमवार यांना जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सेवेतून निलंबित केले आहे.
देवगड पंचायत शिक्षण विभागात सन 2010 ते 2015 या कालावधीत शासकीय निधीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप फेब्रुवारी महिन्यात देवगड पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण चार कर्मचारी सहभागी असून संबंधितांनी या रकमेतून आपल्या गावाकडे स्थावर मालमत्ता निर्माण केली आहे. त्यांच्या दर महिन्याच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी पाहता या कर्मचाऱयांकडे एवढा पैसा कोणत्या मार्गाने येतो, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य कांबळे यांनी केली होती.
या प्रकरणी आवाज उठविण्यात आल्यानंतर जि. प. प्रशासनाने संबंधित घोटाळय़ाबाबत चार सदस्यीय समिती नेमून चौकशी सुरु केली होती. दरम्यान चौकशीत अल्लमवार हा प्रथमदर्शनी दोषी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले असून दोडामार्गाला पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी ही कार्यवाही झाली असल्याची माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी दिली.