प्रतिनिधी / देवगड :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजीटल इंडिया’ या संकल्पनेतून देवगड पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हय़ात प्रथमच जि. प. शाळांतील शिक्षकांसाठी ‘बायोमेट्रीक सिस्टीम‘ बसविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते व माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांच्या उपस्थितीत 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वा. पडेल जि. प. शाळा नं. 1 येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती सुनील पारकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपसभापती डॉ. अमोल तेली, भाजप तालुकाध्यक्ष व पं. स. सदस्य रवी पाळेकर, पं. स. सदस्या पूर्वा तावडे आदी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना पारकर म्हणाले, डिजीटल इंडिया या पंतप्रधानांच्या संकल्पनेप्रमाणे देवगड तालुक्यात प्रथमच देवगड पंचायत समितीने जि. प. शाळांमध्ये बायोमेट्रीक सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नुकतीच सरपंच व ग्रामसेवक यांची एकत्रित बैठक घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. या बायोमेट्रीक सिस्टीमसाठी एका शाळेसाठी सुमारे 15 हजार रुपये खर्च होणार आहे. हा खर्च ग्रामपंचायत स्तरावर केला जाणार आहे. 15 व्या वित्त आयोगातून यावर खर्च करण्यासंदर्भात सरपंच व ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. या बायोमेट्रीक सिस्टीमसाठी देवगड पंचायत समिती स्तरावर एजन्सी नेमली जाणार आहे, असेही ते म्हणाले.
देवगड तालुक्यात 217 शाळा
देवगड तालुक्यात एकूण 217 शाळा असून या सर्व शाळांमध्ये बायोमेट्रीक सिस्टीम बसण्यात येणार आहे. यामुळे शिक्षक किती वाजता आले व शाळेतून किती वाजता घरी गेले, याची माहिती प्रशासनाला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात जि. प. शाळांमध्ये बायोमेट्रीक सिस्टीम बसविण्यात येणार आहे. निधीच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्याने इतर विभागांमध्येही बसविण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.