इस्रोने घेतला निर्णय
बेंगळूर / वृत्तसंस्था
‘जीएसएलव्ही-एफ10’च्या माध्यमातून होणारे जीआयसॅट-1चे प्रक्षेपण तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आल्याची माहिती इस्रोने बुधवारी दिली आहे. प्रक्षेपणाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.
इस्रोने यासंबंधी विस्तृत माहिती देणे टाळले आहे. हा उपग्रह गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाणार होता. जीआयसॅट-1 उपग्रहाचे वजन 2268 किलोग्रॅम असून तो अत्याधुनिक पर्यवेक्षण उपग्रह (मॉडर्न ऑब्जर्वेशन सॅटेलाईट) आहे.
जीआयसॅट-1 उपग्रह देशाची सुरक्षा प्रणाली तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण आहे. या रिमोट सेंसिंग उपग्रहाकाला पहिल्यांदाच ऑर्बिटमध्ये पाठविले जाणार आहे. जीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने अंतराळात 14 वी मोहीम पार पाडली जाणार होती. हा उपग्रह जियोस्टेशनरी ऑर्बिटमध्ये स्थिरावला जाणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भारतीय उपखंडावर तसेच ढगांच्या वाटचालीवर उत्तमप्रकारे देखरेख ठेवता येणार आहे.