क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
कोविडमुळे काल राज्यातील आणखी एका क्रीडा प्रशासकाला मृत्यू आला. गोवा फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष लॅविनियो रिबेलो यांचे काल कोविडमुळे वयाच्या 54व्या वर्षी वास्कोतील एका इस्पितळात शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची आई व दोन बहिणी असा परिवार आहे.
लॅविनियो गोवा फुटबॉल संघटनेच्या कार्यकारी मंडळात मागील दोन दशकें ते कार्यरत होते. म्हापसा येथील सेंट मेरी हायस्कूलमध्ये ते क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते व विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. राज्यात फुटबॉल विकासार्थ आणि प्रामुख्याने उत्तर गोव्यातील गोवा फुटबॉल संघटनेच्या संलग्नील क्लबांमध्ये ते लोकप्रिय होते. कोविडमुळे जीएफएच्या व्यवस्थापकीय मंडळातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. काही महिन्यापूर्वी नावेलीतील बाबूश कुयेल्हो यांचे कोरोनामुळी निधन झाले होते.
हणजुणा येथील निवासी रिबेलो मागील 15 दिवस कोविडमुळे आजारी होते. काल रविवारी हणजुणा दफनभुमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. लॅविनियोच्या जाण्यात मी एक माझा जवळचा मित्र गमवला असल्याचे जीएफएचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव म्हणाले. जीएफएच्या प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या निधनाने जीएफए आणि फुटबॉल खेळाचे नुकसान झाल्याचे चर्चिल आलेमाव म्हणाले. आंतरग्राम क्लबांना मदत मिळवून देण्यात लॅविनियो नेहमीच अग्रेसर राहिले. उत्तर गोव्यातील क्लबांबरोबर दक्षिणेतील क्लबांनाही त्यांनी नेहमीच मार्गदर्शन आणि मदत केली. हणजुणा पंचायतीचे विद्यमान पंच असलेले लॅविनियो अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या फुटसाल आणि बीच फुटबॉल समितीवरही होते. गोवा फुटबॉल संघटनेच्या महिला फुटबॉल लीग, प्रथम विभाग फुटबॉल स्पर्धेसाठी प्रायोजक मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोलाचा होता. सेसा फुटबॉल अकादमी, राज्यातील विविध क्रीडा संघटना, तसेच विविध क्लबांनी आणि देशातील राज्य फुटबॉल संघटनांनी रिबेलो यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले आहे.