प्रतिनिधी / बेळगाव
जीएसएस महाविद्यालयाचा वनस्पती शास्त्र आणि प्राणी शास्त्र विभाग, म्हादई संशोधन केंद्र बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. के. एम. गिरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसकेई सोसायटीचे व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कॅनोपी गोवा आणि प्लॅनेट लाईफ फौंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक पंकज लाड, जीएसएसचे प्राचार्य बी. एल. मजुकर उपस्थित होते.
वन्यजीवांचे संरक्षण आणि जागृतीकरिता भरविण्यात आलेल्या वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून कॅनोपी गोवा आणि प्लॅनेट लाईफ फौंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक पंकज लाड यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, जीएसएसचे प्राचार्य बी. एल. मजुकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी स्वागत केले. यावेळी पंकज लाड यांनी ‘पक्षी भाषा’ या विषयावर चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी पक्ष्यांचे विविध आवाज, पक्ष्यांच्या वेगवेगळय़ा जाती, त्यांचे रंग, त्यांचे खाद्य, त्यांचा अधिवास याबद्दल सविस्तर माहिती दिली.
वन्यजीवांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो महाविद्यालयाच्यावतीने समाजाला वन्यजीवांचे महत्व पटावे, आणि जागृती व्हावी, याकरिता गुरुवार दि. 7 ते शनिवार दि. 9 ऑक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दरम्यान तीन दिवस छायाचित्र प्रदर्शन व वन्यजीवांशी संबंधीत व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
या चित्र प्रदर्शनात वेगवेगळय़ा जातीचे पक्षी, प्राणी व विविध प्रकारच्या वृक्षांची रेखाटलेली चित्रे ठेवण्यात आली आहेत. हे प्रदर्शन शनिवारपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10 ते 6 या वेळेत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. तसेच 4 ते 6 या वेळेत सादरीकरण व माहितीपट दाखविले जात आहेत. सूत्रसंचालन वैष्णवी दानेश्वरी हिने केले तर सुमय्या हिने आभार मानले. याप्रसंगी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.