संस्था भरभराठीसाठी तन-मन-धन आवश्यक : शिक्षण म्हणजे आयुष्याचे जगणे : प्राध्यापकांनी विद्यार्थीप्रिय व्हावे : ग्रंथालय जर्मनीच्या धर्तीवर होण्यासाठी घेतले परिश्रम
प्रतिनिधी / बेळगाव
डॉ. वाय. के. प्रभू उर्फ तात्या यांनी एसकेई सोसायटीसाठी अमूल्य वेळ दिला. या सोसायटीने उत्तमोत्तम शिक्षक देण्याचे काम केले आहे. तात्या, आपले वडील बाबुराव ठाकुर यांच्यासह अनेक जणांनी ही सोसायटी मोठी केली आहे. ही परंपरा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी प्राध्यापक, शिक्षक आणि व्यवस्थापन मंडळाची आहे, असे प्रतिपादन सोसायटीचे विद्यमान चेअरमन किरण ठाकुर यांनी केले.
सोसायटीच्या जीएसएस-आरपीडी कॉलेजच्या ग्रंथालयात डॉ. वाय. के. प्रभू यांच्या स्मृतिदिनादिवशी म्हणजेच गुरुवारी त्यांचे छायाचित्र लावण्यात आले. तत्पूर्वी जिमखाना सभागृहात या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी किरण ठाकुर बोलत होते.
किरण ठाकुर म्हणाले, या सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाने आजपर्यंत एकवाक्मयता टिकवून ठेवली आहे. ही संस्था राजकारणापासून नेहमीच दूर राहिली आहे. संस्था मोठी होण्यासाठी प्रत्येकाने तन, मन, धनाने योगदान दिल्यास मोठा बदल घडू शकतो. प्रत्येकाला हे कॉलेज आपले वाटेल असे काम प्राध्यापकांनी करून विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व्हायला हवे.
यावेळी माधुरी शानभाग म्हणाल्या, माझे वडील म्हणजेच डॉ. वाय. के. प्रभू जर्मनीमध्ये शिकायला गेले. त्यावेळी तेथील ग्रंथालय बघून त्यांनी प्रेरणा घेतली आणि कॉलेजचे ग्रंथालय त्या धर्तीवर होण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. त्यांना नाना नाडकर्णी, घसारी यांचे सहकार्य लाभले. ग्रंथालय म्हणजे ज्ञानाचे मंदिर आहे. त्याचे पावित्र्य आपण जपायला पाहिजे.
प्रा. एस. वाय. प्रभू यांनी वाय. के. प्रभू यांच्या शिक्षणाविषयीच्या कल्पना आणि तळमळ स्पष्ट करून शिक्षण म्हणजे आयुष्याचे जगणे असते, असे सांगितले. हे ग्रंथालय म्हणजे सोसायटीची शान आहे. आपल्या वडिलांनी उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न नेहमीच पाहिले. हेच स्वप्न आजही आपण साकारावयाचे आहे. प्रारंभी प्रा. शोभा नाईक व डॉ. पी. टी. हणमगोंड यांनी वाय. के. प्रभूंनी प्राध्यापक आणि कर्मचारीवर्गाला नेहमीच सहकार्य केल्याचे सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.