प्रतिनिधी/सांगली
सांगलीतील वस्तू व सेवाकर विभागातील वर्ग दोनचे अधिकारी राजेंद्र महालिंग खोत आणि कर सहाय्यक शिवाजी महादेव कांबळे यांना लाच प्रतिबंधक विभागाकडून 40 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी सांगली माधवनगर रोडवरील जीएसटीच्या कार्यालयात करण्यात आली.
या जीएसटीच्या अधिकाऱयांनी तक्रारदाराला तुमच्या फॅक्टरीचा मागील तीन वर्षाचा कर भरला नाही असे सांगत त्यांना सतत धमकावत एक लाख रूपयांची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात या तक्रारदारांने त्यांचा मागील तीन वर्षाचा कर हा ऑनलाईनव्दारे भरला होता. पण तरीही हे अधिकारी लाच मागत होते. त्यामुळे या तक्रारदारांने या मोबाईलवरील संभाषण आणि तक्रार अर्ज लाचलुचतपत विभागाकडे दाखल केला होता. त्यानंतर या अधिकाऱयांनी तक्रारदाराला 40 हजारामध्ये ही केस संपवून टाकू आणि तुमच्या त्रुटी दूर करून देवू असे सांगितले. त्यानुसार या तक्रारदाराने बुधवारी दुपारी आपण तुमच्या कार्यालयात 40 हजार देतो असे सांगितले. त्यानुसार लाचलुचपतचे अधिकाऱयांनी या जीएसटी कार्यालयासमोर आणि बाजूला सापळा रचला.
जीएसटी अधिकारी राजेंद्र महालिंग खोत आणि शिवाजी महादेव कांबळे या दोघांनी तक्रारदाराशी पैसे आणले आहेत का असे विचारले त्यावेळी त्यांनी आणले आहेत असे सांगत त्यांना ही लाचेची रक्कम दिली. ही रक्कम स्विकारता क्षणी लाचलुचपतच्या अधिकाऱयांनी या दोघांना रंगेहात पकडले आणि त्यांच्यावर कारवाई केली.
त्यांच्याविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरिक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले व कर्मचारी संजय कुलगुटगी, अविनाश सागर, जितेंद काळे, भास्कर भोरे, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, राधिका माने, सारीका साळुंखे अश्विनी कुकडे आणि चालक बाळासाहेब पवार यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली.