प्रतिनिधी / पणजी
जीएसटी नुकसान भरपाईचा अडकलेला 750 कोटींचा निधी गोव्याला देण्यात यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सागंतिले. काल मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोवर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. 21 राज्यांपैकी काल 7 राज्यांना या चर्चेत सहभागी होता आले. राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी खाण व्यवसाय सुरु होण्याची गरज असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या कॉन्फरन्स चर्चेद्वारे देशभरातील कोविडची स्थिती व आर्थिक स्थिती आणि उपक्रम यावर चर्चा करण्यात आली. गोव्यालाही यावेळी चर्चेत भाग घेण्याची संधी मिळाली. गोव्यासाठी कोविड केअर निधी देण्याची विनंती यावेळी पंतप्रधानांना केली गेली. त्याचबरोबर मागील 7 ते 8 महिन्यांचा जीएसटी परतावाही गोव्याला मिळावा. सुमारे 750 कोटी रुपये जीएसटी परताव्याच्या स्वरूपात अडकल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यात औद्योगिक क्षेत्रात पूर्ण क्षमतेने काम सुरु झाले आहे. औद्योगिक क्षेत्रात 100 टक्के वीज वापर होत आहे. फार्मा उद्योग व अन्य उद्योग सुरु झाले आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत गोव्याला मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी, यासाठी उपक्रम सुरु होण्याची गरज आहे. गोव्यातील आर्थिक उपक्रमाबाबतही यावेळी पंतप्रधानांना माहिती देण्यात आली.
खाण व्यवसाय सुरु होणे गरजेचे
राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मायनिंग उपक्रम राज्यात सुरु होण्याची गरज आहे. मायनिंग आणि पर्यटन या गोष्टींबाबत पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. मायनिंग सुरु झाले तरच राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मायनिंग सुरु करण्यास मदत करावी, अशी मागणी केली आहे. हॉस्पिटॅलिटी उद्योग अद्याप सुरु झालेले नाहीत. याचीही माहिती पंतप्रधानांना देण्यात आली आहे. खाणी सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र पाठविले आहे. कारण खाण व्यवसाय सुरु झाल्याशिवाय राज्याच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
न्हावेली, बांबोळी, पेडणे स्टेडिअम कोविड सेंटर
न्हावेली, बांबोळी व पेडणे येथील स्टेडिअम कोविड केअर सेंटरसाठी वापरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बांबोळीतील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये पुरुष रुग्णांना तर न्हावेली स्टेडिअममध्ये महिला रुग्णांना
ठेवले जाणार आहे. राज्यातील 95 टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. नव्याने केअर सेंटर करण्याऱया स्टेडीअममध्ये 500 खाटांची क्षमता आहे. पण संसर्ग वाढू नये म्हणून केवळ 200 खाटा घातल्या जाणार आहेत. म्हापसा साई हॉस्टेलचाही कोविड केअर सेंटर म्हणून वापर केला जाणार आहे. सध्या कोविड रुग्णांसाठी 800 खाटांचे नियोजन केले आहे. 250 शिरोडा येथे तर 180 खाटांचे नियोजन एमपीटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. कोलवा कळंगुट रेसिडेन्सीमध्ये 200 खाटा तर मडगाव कोविड केअर सेंटरमध्ये 220 खाटांचे नियोजन आहे, असेही ते म्हणाले.
बायणा भाग मायक्रो कंटेनमेंट झोन
बायणाचा काही भाग मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जाणार आहे तर इतर भाग बफर झोन म्हणून जाहीर केला जाणार आहे. याबाबतचा आदेश बुधवारी जारी केला जाणार आहे. गोव्यातील चाचण्याचा दर देशात सर्वाधिक आहे. दशलक्षमागे 29 हजार चाचण्या अशी गोव्याची सरासरी आहे. प्रतिदिन 2500 चाचण्या करण्याची क्षमता आहे. सध्या पंजाब मॉडेलपेक्षा गोवा मॉडेल चांगला आहे. गोव्यात अद्याप एकही मृत्यू झाला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आरोग्य सेतु ऍप पोलीस कंट्रोल रुमला कनेक्ट केले आहे. आतापर्यंत 3 लाख लोकांनी हा ऍप डाऊनलोड केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा सोडून 1.20 लाख मजूर गेले
आतापर्यंत 1.20 लाख मजूर गोवा सोडून गेले. 21 हजार लोक गोव्यात आले. 4 हजार खलाशी व विदेशात असलेले लोक गोव्यात आले. आतापर्यंत 26 हजार लोकांना मास्क न वापरल्याप्रकरणी व 10 हजार लोकांना रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी दंड दिला आहे.