1 लाख 23 हजार 902 कोटी इतका कर वसूल : अर्थ मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा प्रकोप आणि लॉकडाऊनमुळे खराब स्थितीत असलेली अर्थव्यवस्था आता रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यातील जीएसटी संकलनाने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मार्च 2021 मध्ये तब्बल 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल केल्याने आतापर्यंतचा उच्चांकी आकडा गाठला गेला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी मिळाला असल्याचे ट्विट अर्थ मंत्रालयाने केले आहे.
मार्च महिन्यात संकलित झालेल्या एकूण जीएसटीत केंद्र सरकारचा कर (सीजीएसटी) 22,973 कोटी, राज्याचा कर (एसजीएसटी) 29,329 कोटी आणि एकीकृत जीएसटी 62,842 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर उपकर 8 हजार 758 कोटी इतका आहे. यात 935 कोटी रुपये वस्तू आयातीवर मिळालेल्या कराचे आहेत. कोरोनाच्या प्रकोपानंतर सलग सहाव्यांदा जीएसटी 1 लाख कोटीच्या पार मिळाला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात म्हणजे मार्च 2020 मध्ये 97 हजार 590 कोटी रुपये इतके संकलन झाले होते. त्या तुलनेत यंदाचे उत्पन्न बरेच अधिक असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्येही मार्च महिन्यातील जीएसटी उत्पन्न सर्वाधिक ठरले आहे.
गेल्या 6 महिन्यांतील जीएसटी संकलन (कोटी रुपयात)
- मार्च 2021 1,23,902
- फेब्रुवारी 2021 1,13,143
- जानेवारी 2021 1,19,875
- डिसेंबर 2020 1,15,174
- नोव्हेंबर 2020 1,04,963
- ऑक्टोबर 2020 1,05,155