प्रतिनिधी/ बेळगाव
जीपीएस नकाशाकरिता बेळगाव शहराची हद्द कुठपर्यंत आहे, याची माहिती देण्याची जबाबदारी दोन महिन्यांपूर्वी महापालिकेवर सोपविण्यात आली होती. मात्र, मनपाच्या अधिकाऱयांनी माहिती तयार केली नव्हती. पंधरा दिवस रात्रंदिवस काम करून जीपीएस नकाशाकरिता अखेर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी पंधरा अधिकाऱयांचे पथक मंगळवारी बागलकोटला रवाना झाले आहे.
बेळगाव शहराचा विकास आराखडा बुडाकडून तयार करण्यात येत आहे. मात्र, जीपीएस आराखडा तयार करण्याचे काम बागलकोट येथे सुरू आहे. सदर आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेच्या महसूल निरीक्षकांना तीन महिन्यांपूर्वी प्रशिक्षण देण्यात आले होते. सदर आराखडा तयार करून सादर करण्याची सूचना दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. बेळगाव महापालिका व्याप्तीत येणारे वॉर्ड व प्रत्येक वॉर्डची हद्द तसेच शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारी हद्द असा विविध तपशील देण्याची सूचना करण्यात आली होती.
शहराच्या हद्दीवर कोणती ग्राम पंचायत आहे व हद्दीजवळ शेतजमीन असल्यास सर्व्हे क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक होते. महापालिका व्याप्तीमध्ये महत्त्वाची स्थळे, रस्ते व हद्दीवरील लँडमार्क दाखविण्याची सूचना करण्यात आली होती. याबाबत सविस्तर आराखडा तयार करून बागलकोटला सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱयांनी याबाबत कोणतीच कार्यवाही केली नव्हती. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी या आराखडय़ाबाबत विचारणा करण्यात आल्याने आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले हेते.
शहर आणि ग्रामीण भागाच्या हद्दीवर पंधरा वॉर्ड येतात. त्यामुळे पंधरा वॉर्डच्या महसूल निरीक्षकांकडून सर्व माहिती घेण्यात आली होती. सदर काम वाढल्याने वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या सभागृहात आराखडा तयार करण्याचे काम करण्यात आले. अखेर आराखडा तयार झाला असून तो सादर करण्यासाठी मनपाच्या महसूल अधिकाऱयांचे पथक मंगळवारी बागलकोटला रवाना झाले आहे. महसूल निरीक्षक, वॉर्ड क्लार्क आणि इतर अधिकाऱयांसह पंधरा जण बागलकोटला गेले आहेत.