डॉ. शिवाजी शेट यांचा आरोप
प्रतिनिधी / पणजी
गोवा कला महाविद्यालयात प्राचार्यपदी एका पात्र गोमंतकीय उमेदवारास डावलून बिगर गोमंतकीयास नोकरी देण्याचे षडयंत्र चालत असून त्यात जीपीएससीचे अध्यक्ष नोरोन्हा यांच्यासह निवड समितीचे सदस्य व अन्य अधिकारीही सहभागी असल्याचा आरोप डॉ. शिवाजी शेट या उमेदवाराने केला आहे. यासंबंधी माहिती कायद्याखाली माहिती मागितल्यास जीपीएसीकडून अपूर्ण आणि चुकीची माहिती देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी शुक्रवारी जीपीएसीच्या प्रवेशद्वारावरच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. 12 फेब्रुवारी 21 रोजी जीपीएससीतर्फे गोवा कला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदासाठी मुलाखत घेण्यात आली होती. त्यासाठी केवळ दोनच उमेदवार होते. त्यातील एक उमेदवार ही बिगर गोमंतकीय महिला होती. सकाळी झालेल्या मुलाखतीचा निकाल त्याच दिवशी सायंकाळी वॅबसाईटवर जाहीर करण्यात आला व पर्सोनेल खात्यास पाठविलेल्या नोटमध्ये सदर बिगर गोमंतकीय उमेदवारास सरकारी नियुक्ती नियमांनुसार कोकणी भाषा ज्ञानाच्या अटीतून सूट देण्यास कळविण्यात आले होते. प्रत्यक्षात जीपीएसी कायद्यात अशाप्रकारे सूट देण्याची तजवीजच नाही, त्यासंबंधी आपण आरटीआयद्वारे माहिती मागितली असता जीपीएसीने अपूर्ण माहिती दिली. बैठकीच्या इतिवृत्तांताची प्रत मागितल्यास ती देण्यास नकार देण्यात आला, असेही डॉ. शेट यांनी सांगितले.
त्यानंतर आपण पर्सोनेल खात्यात चौकशी केली असता तेथे आपल्या उमेदवारीसंबंधी कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. तसेच पर्सोनेल खात्याने पुन्हा जीपेएससीला पत्र पाठवून सदर उमेदवारास हवी असलेली माहिती देण्यास सांगितले आहे. यावरून जीपीएसीतच खोटारडेपणा लपलेला आहे हेच उघड होत असल्याचे डॉ. शेट म्हणाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आपणास न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.