स्वातंत्र्य सैनिकाच्या सुपुत्राचा स्वातंत्र्यदिनी निर्धार : 10 लाख पर्यंत खर्च करण्याची ठेवली तयारी,गोवा कला महाविद्यालय प्राचार्यपदाचा वाद
जय नाईक /पणजी
गोवा कला महाविद्यालय प्राचार्यपदासाठी ’सुंदरता’ हा निकष लावून उमेदवारी डावलण्याचे प्रयत्न होत असलेले डॉ. शिवाजी शेट यांनी आता जीपीएससीच्या आवश्यकतेनुसार स्वतःचा ’लूक’ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रसंगी आपण चेहऱयाची प्लास्टिक सर्जरीसुद्धा करून घेणार असून सुंदर दिसण्यासाठी 10 लाख रुपयेपर्यंत खर्च करण्याची तयारी ठेवली आहे, अशी माहिती डॉ. शेट यांनी दिली आहे. आपण एका स्वातंत्र्य सैनिकाचा पूत्र असून आजच्या स्वातंत्र्यदिनी हा निर्धार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या वादग्रस्तेमुळे देशभरात गाजणाऱया ’पठाण’ या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहरूख खानने लाखो रुपये खर्च करून लूक बदलला असल्याचे वृत्त हल्लीच पसरले होते. त्याच धर्तीवर आपणही चेहरामोहरा बदलणार असल्याचे शेट यांनी सांगितले.
खरे तर जीपीएससीने पहिल्या मुलाखतीवेळीच सुंदरतेच्या निकषाबद्दल कल्पना दिली असती तर न्यायालयात जाण्याची वेळच आली नसती. राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या मनधरणीसाठी पत्रव्यवहार करण्यात जो वेळ आणि पैसा खर्च करावा लागला, तो वाचला असता. तसेच एकाच पदासाठी पुन्हा पन्हा मुलाखतीही द्याव्या लागल्या नसत्या. त्याशिवाय या सर्व प्रक्रियेत जे मानसिक त्रास, खच्चीकरण झाले त्यांनाही सामोरे जावे लागले नसते. किंबहुना एव्हाना ’हिरो’ बनून आपण प्राचार्यपदी विराजमान झालो असतो, असे डॉ. शेट म्हणाले.
सदर पदासाठी सर्व निकषांवर पात्र असतानाही ते पद आपणास मिळू नये या एकाच हेतूने ज्या प्रकारे जीपीएससीने नवनवे निकष जोडून वेळकाढू धोरण अवलंबले, त्या खटपटीमुळे कला महाविद्यालयाचे प्राचार्यपद चार वर्षे रिक्त राहिले. त्यातून महाविद्यालयाचे प्रशासन पार कोलमडले. विद्यार्थ्यांचेही अतोनात नुकसान झाले. या नुकसानीला जबाबदार कोण?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपणास उमेदवारी डावलण्यासाठी जे पात्रतेचे निकष ऐनवेळी जोडण्यात आले त्यात, ’उमेदवारामध्ये आत्मविश्वासाचा अभाव’, असेही एक कारण देण्यात आले आहे. ते पूर्ण चुकीचे आणि बेजबाबदार आहे, असे ते म्हणाले. आत्मविश्वास नसता तर गोव्याच्या कला क्षेत्रात डॉक्टरेट मिळविणारा ’पहिला आणि एकमेव गोमंतकीय’ हा बहुमान आपणास मिळालाच नसता. त्याच आत्मविश्वासाच्या बळावर गेल्या चार वर्षांपासून या पदासाठी मोठय़ा हिंमतीने आणि चिकाटीने आपण लढा देत आहे. अन्यथा एव्हाना खचून गेलो असतो, असेही डॉ. शेट यांनी सांगितले.
अशा प्रकारे सुंदरता, आत्मविश्वास यासारख्या निकषांच्या आधारावर सरकारी नोकऱया दिल्या जाऊ लागल्या तर भविष्यात दिव्यांग, विशेष क्षमतेच्या लोकांसाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते. अशी भीती डॉ. शेट यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर भेदभाव करणारे असे निकष लावणे हाच मुळात गुन्हा ठरू शकतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सदर पदासाठी चार वर्षे लढा दिल्यानंतरही समजा काही कारणवश आपणास डावलण्यात आलेच तर त्या जागी कुणाची वर्णी लावणार. बॉलिवूडमधील एखादा सुंदर दिसणारा अभिनेता आणणार का? किंवा ’सुंदरता, आत्मविश्वास’ यासारख्या गुणांचे ’प्रोग्रामिंग’ केलेला रोबोट आणून बसवणार का?, असे गंभीर सवाल डॉ. शेट यांनी उपस्थित केले आहेत.