बहरिन ग्रां प्रि फॉर्म्युला वन : हॅलो सुविधेमुळे बचावल्याची प्रतिक्रिया
वृत्तसंस्था/ साखिर, बहरिन
येथे झालेल्या बहरिन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीतील पहिल्या लॅपवेळीच रोमेन ग्रोस्जेनच्या हास गाडीला भयानक अपघात झाल्यानंतर ती पेट घेतली. पण हॅलो या सुरक्षिततेच्या सुविधेमुळे या जीवघेण्या अपघातातून तो सुरक्षित बचावला आहे. या दुर्घटनेनंतर शर्यत थांबविण्यात आली आणि सर्व गाडय़ां पिटलेनमध्ये नेण्यात आल्या होत्या.
फॉर्म्युला वन ड्रायव्हर्सच्या सुरक्षिततेसाठी एफआयएने 2018 पासून हॅलो ही सुविधा सुरू केली आहे. ड्रायव्हरच्या डोक्याच्या मागील बाजूस ही सोय करण्यात आली आहे. मात्र अनेक ड्रायव्हर्सना ते आवडले नसल्याने त्यांनी नापसंती व्यक्त केली होती, त्यात ग्रोस्जेनचाही समावेश होता. रविवारी झालेल्या दुर्घटनेनंतर मात्र सर्वांनाच या सुविधेची उपयुक्तता कळून आली आणि या सोयीमुळेच ग्रोस्जेन बचावल्याची प्रतिक्रिया सर्वांनीच व्यक्त केली.
शर्यत सुरू झाल्यानंतर पहिल्या लॅपवेळीच डॅनील क्वायटच्या अल्फा टॉरी गाडीला ग्रोस्जेनच्या हास गाडीने इतकी जोरदार धडक दिली की त्याचे दोन तुकडे झाले आणि बाजूच्या रेलिंगवर आदळल्यानंतर गाडीतील इंधनाची टाकी फुटली आणि गाडीने लगेच पेट घेतल्यानंतर ज्वाळा भडकू लागल्या. अपघातानंतर मेडिकल स्टाफ व सुरक्षा कारने ताबडतोब तेथे धाव घेतली आणि अग्निशमनद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी ग्रोस्जेनही गाडीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करताना त्याला सुरक्षा कर्मचाऱयांनी मदत केली. इतका गंभीर अपघात झाला असला तरी ग्रोस्जेनला फारशी दुखापत झाली नाही. त्याच्या हाताच्या बोटांना आगीची झळ लागली होती. पण त्याला कोणतेही प्रॅक्चर झाले नाही. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून मंगळवारपर्यंत त्याला तेथे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे हासचे बॉस गुंथेर स्टीनर यांनी सांगितले. त्याच्या बोटांना व पायाच्या घोटय़ाला झळ बसल्याने किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्याला मानसिक धक्का बसला असला तरी तो पूर्णपणे ठीक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ग्रोस्जेननेही हॉस्पिटलमधून, आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केलेल्या सर्वांचेच त्याने आभारही मानले आहेत.
‘ग्रोस्जेन जिवंत आहे, हा अद्भुत चमत्कार आहे,’ अशी प्रतिक्रिया 1996 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन असलेले डेमन हिल यांनी दिली. 1994 मध्ये अशीच दुर्घटना सॅन मारिनोतील शर्यतीवेळी घडली होती आणि त्यावेळी ब्राझीलचे ड्रायव्हर आयर्टन सेना यांचे निधन झाले होते. डेमन हिल हे त्यावेळी सेना यांचे संघसहकारी होते. ग्रोस्जेन सुरक्षित असल्याचे पाहून चीफ मेडिकल ऑफिसर व्हान डर मेर्वे यांनीही आश्चर्य व्यक्त केले. ‘गेल्या 12 वर्षात इतकी भडकलेली आग आम्ही पाहिली नव्हती. तो स्वतः गाडीतून बाहेर पडण्याची तयारी करीत असल्याचे पाहूनच आम्ही चकित झालो होतो. तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे पाहून आम्हाला दिलासा मिळाला. हॅलोज, बॅरियर्स, सीटबेल्ट्स या परिपूर्ण सुविधा असल्यामुळेच हे शक्य झाले,’ असेही ते म्हणाले.
बहरिन ग्रां प्रिमध्ये मर्सिडीजचा हॅमिल्टन विजेता
येथील शर्यतील मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनने जेतेपद पटकावले. रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने दुसरे तर अलेक्झांडर अल्बनने तिसरे स्थान मिळविले. हॅमिल्टनने तुर्कीमध्ये झालेल्या शर्यतीवेळीच सातव्यांदा चॅम्पियनशिप जिंकून विश्वविक्रमाशी बरोबरी केली होती. येथे मिळविलेले जेतेपद हे त्याचे 95 वे व या मोसमातील 11 वे जेतेपद आहे. मॅक्लारेनच्या लँडो नॉरिसने चौथे, त्याचाच सहकारी कार्लोस सेन्झने पाचवे, अल्फा टॉरीच्या पीयर गॅसलीने सहावे, रेनॉच्या डॅनियल रिकार्दोने सातवे, मर्सिडीजच्या व्हाल्टेरी बोटासने आठवे, रेनॉच्या इस्टेबन ओकॉनने नववे आणि फेरारीच्या चार्लस लेसलर्कने दहावे स्थान मिळविले. हॅमिल्टनने आता बोटासवर 131 गुणांची आघाडी घेतली असून हॅमिल्टनने याआधीच चॅम्पियनशिप निश्चित केली आहे.
शर्यत जिंकल्यानंतर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली ती ग्रोस्जेन सुरक्षित बचावला याची. ‘ग्रोस्जेनला झालेला अपघात हे अतिशय भयावह आणि हारदवून टाकणारे दृश्य होते. फॉर्म्युला वन आणि एफआयएने पुरविलेल्या उत्कृष्ट आणि दर्जेदार सुविधेमुळेच भयानक दुर्घटनेनंतरही तो स्वतः चालत बाहेर आला,’ असे हॅमिल्टन म्हणाला.