प्रतिनिधी/ बेळगाव
येथील जीवनदीप फौंडेशनच्या सदस्यांनी महावीर जयंतीच्या निमित्ताने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिठाई व आहार वितरण केले. हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्व उत्सव-समारंभ रद्द झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महावीर जयंती उत्सवाच्या निमित्ताने जीवनदीप फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आहार आणि मिठाई वितरणाचा संकल्प केला. तसेच याचे नियोजनबद्ध वितरण करून रुग्ण व त्यांच्या नातलगांच्या चेहऱयावर समाधान फुलविले.
माजी नगरसेवक किरण परब यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेचे राजू वर्पे, सुनील बोकडे, सूरज गवळी, सागर भोसले, नंदकुमार पाटील, रवी धनूचे, श्रीकांत धनूचे आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.
माजी नगरसेवक मोहन चिगरे यांनीही यासाठी मोलाचे सहकार्य केले. सामाजिक कार्यकर्ते भाऊ गुंडपन्नवर यांनी मिठाई वितरणासाठी आर्थिक हातभार लावला.