प्रतिनिधी / बेळगाव
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर असणाऱया जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये गुरुवार दि. 10 डिसेंबरपासून कोरोनाच्या तिसऱया टप्प्यातील को-व्हॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. बुधवारी संध्याकाळी चाचणीसाठीच्या लस जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या आहेत. देशभरात ज्या 25 हॉस्पिटल्सना ही चाचणी करण्याची मान्यता मिळाली आहे, त्यामध्ये बेळगावचे जीवनरेखा हॉस्पिटल हे एक आहे. भारत बायोटेकच्या मार्गदर्शनाखाली आयसीएमआरच्या सहकार्याने जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये यापूर्वी दोन चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
आता तिसऱया टप्प्यातील चाचणी सुरू होणार आहे. पहिल्या व दुसऱया टप्प्यातील चाचण्यांचे कोणतेही साईड इफेक्ट्स पुढे आले नसून त्याचे निकाल उत्तम आले आहेत. सदर चाचणी लस पहिल्या दिवशी व त्यानंतर 28 व्या दिवशी दुसऱयांदा दिली जाईल. तत्पूर्वी आरटीपीसीआर व रक्ताचा नमुना तपासला जाईल.
सदर लस पूर्णत: विनामूल्य दिली जाणार असून, 18 वर्षांवरील सुदृढ व्यक्तींनी चाचणी करून घेण्यासाठी पुढे यावे व नाव नोंदणीसाठी 9743433294, 9113222185 किंवा 9019601976 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे हॉस्पिटलचे संचालक व या प्रक्रियेचे प्रमुख डॉ. अमित भाते यांनी कळविले आहे.
चाचणीसाठी आधारकार्ड आवश्यक
चाचणीसाठी येणाऱया इच्छुकांनी आपल्या समवेत आधारकार्ड व त्याची नक्कल प्रत घेऊन येणे आवश्यक आहे, असे जीवनरेखातर्फे कळविण्यात आले आहे.