प्रतिनिधी / कुर्डुवाडी
घटनेचे गांभीर्य ओळखून २४ तासाच्या आत गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुस्क्या आवळून चोरीस गेलेल्या मालापैकी १ लाख रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात तपासी अधिकारी सहा पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्र यांच्या पथकाला यश आले आहे. यातील आणखी दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. शनैश्वर विश्वनाथ काळे ( वय ३५ ) रा.वडाचीवाडी ता.माढा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सोशल मिडिया फेसबुकच्या माध्यमातून तिघाजणांनी संगनमत करुन फेसबुकवर पल्सर गाडी ५० हजार रूपयांना विकायची आहे अशी पोस्ट टाकली होती. यातील फिर्यादी देविदास आत्माराम ढमाले रा.लातुर याचे मित्र विजय वाघमारे रा.लातुर यास पल्सर गाडी घ्यावयाची असल्याने फेसबुक पोस्टवरील चिरंजीव काळे याचा फोन नंबर घेऊन त्याच्याशी संपर्क साधला. फिर्यादी व त्याचे तीन मित्र दि.२७ रोजी आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी पिंपळखुटे ते वडाचीवाडी रोडवर आले असताना आरोपींनी चाकूचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीस जखमी करून जीवे मारण्याची धमकी देत त्यांचेकडील रोख ५६ हजार १०० रुपये व ५४ हजार २०० रुपये किंमतीचे चार अँड्रॉईड मोबाइल, घड्याळ असा एकूण १ लाख १०३०० रूपयांचा ऐवज जबरीने काढून घेतला होता.
याबाबत दि.२८ रोजी देविदास ढमाले यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. फिर्याद दाखल होताच काही तासातच गोपनीय माहितीद्वारे दि.२८ रोजी रात्री ९ वा. तपास अधिकारी सहा.पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी मुख्य आरोपीच्या मुस्क्या आवळल्या व त्याच्याकडून चोरीस गेलेल्या मालापैकी रोख रक्कम व ऐवज असा एकूण १ लाख ३०० रूपयांचा माल हस्तगत केला.तपासी अधिकारी सहा पो.निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी २४ तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ही कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक डोंगर, तपासी अधिकारी सहा.पो.निरीक्षक चिमणाजी केंद्रे,पो.उप.निरीक्षक वाघमारे,पो.हे.कॉ. ललित शिंदे, पो.शि.दत्ता सोमवाड,पो.ना.दीपक घोरपडे, पो.शि.सागर गवळी, पो.शि.संभाजी शिंदे, पो.शि.सिद्धनाथ वल्टे यांच्या पथकाने केली.