क्रीडा प्रतिनिधी/ फोंडा
फर्मागुडी-फोंडा येथील जीव्हीएमच्या गोपाळ गोविंद पै रायतुरकर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ‘समाजातील दुर्लक्षीत घटकांची खेळाद्वारे जीवन परीवर्तन’ या विषयावर राष्ट्रीय परीसंवाद 7 व 8 रोजी फोंडा येथील हॉटेल मिनीनो एक्सक्युटिव्ह येथे आयोजित करण्यात आला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने हा परीसंवाद घेण्यात येईल. अशी माहिती प्राचार्य प्रवीण भेंडे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
यावेळी उपप्राचार्य एम. एम. चिकोडीकर, महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालीका बॅटी डिसील्वा व केनेडी डिसील्वा हे उपस्थित होते. या परीसंवादात 120 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यात 20 जण परराज्यातील प्रतिनिधी असेल. यात विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षक, शारीरिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे. दुर्लक्षीत घटकातील मुलांना खेळाच्या माध्यमातून शिक्षण देणे, आरोग्याविषयी जागृती करणे, जीवन कौशल्य विकास, शारीरिक तंदुरुस्ती सुधारणे व त्यांना क्रीडा क्षेत्रात भवितव्य प्राप्त करुन देणे हा या परीसंवादाचा उद्देश आहे. प्रमुख वक्त्या म्हणून पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेत्या मलाथी होल्ला, अर्जुन पुरस्कार विजेत्या व खेलो इंडियाच्या कार्यकारी संचालीका रचना गोविल, नरचरींग एक्सेलन्स इन स्पोर्ट्स ट्रस्टचे कार्यकारी सचिव करण नांगिया, स्पोर्ट्स कोएलिशन ऑफ इंडियाचे निमंत्रक जोजेफ निर्मल राज व गेम चेंजर्स फाऊंडेशन बेंगलोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिल्वेस्टर स्टेलीन हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत तसेच भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. 7 रोजी सकाळी उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी क्रीडा खात्याचे संचालक शशांक मणी त्रिपाठी व पद्मश्री नॉर्मा आल्वारीस या उपस्थित राहणार आहेत.