गोल्डन व्हिसा मिळणारा जागतिक स्तरावरील पहिला गोल्फर
दुबई / वृत्तसंस्था
स्टार इंडियन गोल्फर जीव मिल्खा सिंग प्रतिष्ठेचा 10 वर्षांचा दुबई गोल्डन व्हिसाने सन्मानित केले जाणारे जागतिक स्तरावरील पहिले गोल्फपटू ठरले. गोल्फमधील योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांना हा व्हिसा प्रदान केला गेला.
49 वर्षीय जीव मिल्खा सिंग यांचे दुबईत अनेक स्पर्धांच्या माध्यमातून बरेच वास्तव्य राहिले. शिवाय, त्यांचा येथील मित्रपरिवारही मोठा आहे. 2001 दुबई डेझर्ट क्लासिकमध्ये जीव यांनी विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी त्यांनी केवळ 94 पुटसह 4 फेऱया पूर्ण केल्या आणि संयुक्त सहावे स्थान संपादन केले होते. चारवेळा युरोपियन टायटल, 4 वेळा जपान गोल्फ टूर, 6 वेळा आशियाई टूर टायटल जिंकणारे जीव मिल्खा यांना यावेळी दुबई प्रशासनाने 10 वर्षांच्या गोल्डन कार्डने सन्मानित केले.
‘माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे. मी 1993 मध्ये प्रथमच दुबईत आलो आणि त्याक्षणी दुबईच्या प्रेमात पडलो. माझ्या कुटुंबियांना येथील रेस्टॉरंट, शॉपिंग पसंतीला उतरले. मात्र, व्यावसायिक गोल्फपटू या नात्याने येथील गोल्फ कोर्सेस व प्रॅक्टिस फॅसिलिटीज मला अधिक भावले. मला दुबईने बरेच पाठबळही दिले. जुमेराह गोल्फ इस्टेट्सचा मी पहिला ऍम्बॅसेडर होतो’, असे जीव मिल्खा याप्रसंगी म्हणाले.