नवजातांना सुरक्षित ठेवण्यासाठी बंकरमध्ये हलविले, डॉक्टर-नर्सनी भूमिगत रुग्णालयाची केली निर्मिती
युक्रेनमध्ये युद्धाचा प्रभाव आता नागरिकांसोबत जन्माला येणाऱया नवजातांवरही दिसून येतोय. राजधानी कीव्हला लागून असलेल्या डनिप्रोमध्ये नवजातांना रशियाच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी बंकरमध्ये नेण्यात येत असून तेथे नर्स त्यांची देखभाल करत आहेत. बंकरमध्ये सुमारे 12 नवजातांना ठेवण्यात आले आहे. बंकरमध्ये कॅमेरे बसविण्यात आले असून याद्वारे देखभालीची पाहणी केली जातेय.
मुलांच्या सुरक्षेला प्राथमिकता असून याकरता आम्ही तळघरात वॉर्ड तयार करत त्यांना तेथे हलविले आहे. बंकरमध्ये या मुलांना सुरक्षित ठेवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. ही स्थिती अकल्पनीय असल्याचे उद्गार स्थानिक रुग्णालयाचे सुपरिटेंडेंट डॉ. डेनिस सुर्खोव्ह यांनी काढले आहेत.
कीव्हमध्ये रशियाच्या सैन्याच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी महिला आणि मुलांना सुरक्षित स्थळी पाठविण्यात आले आहे. सर्वांना सैन्याच्या देखरेखीत बॉम्बविरोधी शेल्टर होममध्ये हलविण्यात आले. तर पुरुषांना सैन्यासोबत युद्धआघाडीवर दाखल होण्या सांगण्यात आले आहे. युक्रेन सरकारने 18 वर्षांपासून 60 वर्षांपर्यंतच्या लोकांना देशाबाहेर जाण्यास बंदी घातली आहे.