क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
गोवा क्रिकेट संघटनेची आमसभा काल 27 सप्टेंबर रोजी वेबिनारद्धारे झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी संलग्न असलेली गोवा क्रिकेट संघटना आता वेबिनारद्वारे आमसभा आयोजित करणारी देशातील पहिली राज्य क्रिकेट संघटना ठरली आहे. वेबिनार सॅक्युअर नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ई-वोटिंगवर घेण्यात आले. भारत सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने एनएसडीएसला मान्यता दिली आहे.
अजेंडातील सर्व ठराव संमत
कालच्या आमसभेत वेबिनारद्वारे 60 हून अधिक क्लबांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला. आमसभेचा अजेंडा मागील आमसभेचे इतिवृतांचे वाचन आणि पुष्टी करणे, वार्षिक अहवालास मंजुरी देणे, 2019-20 च्या आर्थिक ताळेबंदाला मान्यता देणे, 2020-21 आर्थिक वर्षांसाठी ऑडिटर आणि अंतर्गत ऑडिटरांची नेमणूक करणे असा होता. या सर्वांना आमसभेची मान्यता मिळविण्यात आली. नॅलिया वॅरोष्का कोट्टा दो रेगो यांची ऑडिटर म्हणून तर चिराग केंकरे अँड कंपनी यांची अंतर्गत रेख परीक्षक म्हणून निवड करण्यात आली.
गोवा क्रिकेट संघटनेच्या घटनेनुसार संघटनेने 30 सप्टेंबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी आपली आमसभा ठेवणे आवश्यक आहे, तथापि गृहमंत्रालयाच्या सल्ल्यानुसार देशातील सहकारी संस्थांच्या अनेक निबंधकांनी ही तारीख 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. जीसीएने सप्टेंबर 2020 पूर्वी आमसभा ठेवण्याच्या परवानगीसाठी सहकार निबंधकांशी लेखी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर सहकार निबंधकानी आमसभा ठेवण्यासाठी जीसीएला कळविले. गृहमंत्रालयाच्या एसओपीनुसार, भारत सरकारने एसओपी 100 पेक्षा जास्त सदस्यांचा मेळावा घेण्यास परवानगी देत नसल्याने आणि जीसीएशी सलंग्नीत अनेक क्लबांचे सदस्य 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, त्यांची सुरक्षा आणि जीसीएची सुरक्षा लक्षात घेता आभासी सर्वसाधारण सभेत जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
चेतन चौहान, फर्डी कुयेल्हो, समीर काणेकरना श्रद्धांजली
वेबिनारद्वारे झालेल्या आमसभेत भारताचे माजी कसोटीपटू आणि उत्तरप्रदेशचे मंत्री चेतन चौहान, गोव्याचे रणजी क्रिकेटपटू फर्डीनंद कुयेल्हो, करिमाबाद क्रिकेट क्लबचे सचिव समीर काणेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. जीसीएचे माजी अध्यक्ष आणि सनी स्पोर्ट्स क्लबचे सचिव चेतन देसाई यांनी चेतन चौहान यांच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानावर भाष्य केले. जीसीएचे माजी अध्यक्ष आणि रॉयल स्पोर्ट्स क्लबचे सचिव विनोद फडके यांनी फर्डीनंद कुयेल्हो आणि समीर काणेकर यांच्याबद्दल भाष्य केले. मडगाव क्रिकेट क्लबचे सचिव अपूर्व भेंब्रे यांनीही यावेळी त्याच्या क्लबचे सदस्य कुयेल्हो यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
क्लबांना अनुदान आणि मैदानांचे अपगेडेशन
आमसभेत जीसीएच्या सलंग्नीत क्लबांना मान्यताप्राप्त नमुन्यानुसार आणि खर्च करण्याच्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार गेल्या वर्षाचे प्रत्येकी 1 लाखांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमसभेत धारबांदोडा पंचायत मैदान, माशे ग्राम पंचायत मैदान तसेच गोवा क्रिकेट संघटनेच्या पर्वरी आणि सांगे क्रिकेट मैदानांचे अपग्रेडेशन करण्याच्या प्रस्तावालाही यावेळी मान्यता मिळाली. धारबांदोडा आणि माशे पंचायत मैदानांचा जीसीए बरोबरचा करार 9 वर्षांचा असेल. जीसीएची वास्को, पेडणे आणि डिचोलीतही मैदाने असावीत, असे मत यावेळी जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी मांडले. मैदानांना जागा मिळविण्यासाठी रेवोडा कोमुनिदादशी सध्या सचिव विपुल फडके जमीनीच्या ताब्यासाठी संपर्कात असल्याचे ते म्हणाले.
अशोक दिंडा, अमित वर्मा यंदाचे प्रोफेशनल्स
बीसीसीआयने रणजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन यंदा केले तर त्यासाठी जीसीए तयार असल्याचे अध्यक्ष लोटलीकर यावेळी म्हणाले. यंदा गोव्यासाठी अशोक दिंडा आणि अमित वर्मा हे प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून खेळणार असल्याचेही यावेळी लोटलीकर म्हणाले.
वेबिनारद्वारे आमसभा घेणारी गोवा क्रिकेट संघटना ही देशातील पहिली राज्य क्रिकेट संघटना आता बनली आहे. या व्यतिरिक्त आमच्या सर्व क्रिकेटपटूंना आभासी शारिरीक तंदुरूस्तीचे वर्ग घेऊन त्यांच्या कामगिरीवर नजर ठेवणारी व त्यांना मार्गदर्शन करणारी आमची पहिली राज्य क्रिकेट संघटना असल्याचेही यावेळी लोटलीकर म्हणाले.