आरटीआय कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा दावा
प्रतिनिधी/ पणजी
गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या कारभारात मोठा घोटाळा झाल्याचे आरटीआय कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी म्हटले असून धारगळ येथील नियोजित रु. 350 कोटींचा स्टेडियम म्हणजे कोटय़वधींचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकल्पाची छाननी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून जीसीएवर प्रशासक नेमावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. शिवाय जीसीएच्या संपूर्ण कारभाराची एकदा चौकशी करावी, अशी मागणी रॉड्रिग्स यांनी केली आहे.
जीसीएचे माजी सचिव हे वादग्रस्त ठरले होते. त्यांचे पुत्र असलेले विद्यमान सचिवदेखील कथित घोटाळय़ांमुळे वादग्रस्त बनले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि न्या. लोढा समितीच्या शिफारशी, नियम अटी गुंडाळून वाटेल तसे व्यवहार सचिवांनी चालविल्याचे रॉडिग्स यांनी म्हटले आहे.
मर्यादा ओलांडून सचिवांकडून 9 लाख खर्च
सचिवांना रु 5 लाख खर्च करण्याची मर्यादा असताना त्यांनी 9 लाख रु. खर्च केले असून त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यात आलेली नाही. आपल्या जवळच्या माणसांना त्यांनी कंत्राट दिले, असा आरोप रॉड्रिग्स यांनी केला आहे. विविध कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या नाहीत. शिवाय खर्चाची माहिती जीसीए वेबसाईटवर प्रकाशित केली नाही. मासिक बैठकही घेण्यात आली नसल्याचे रॉड्रिग्स यांनी निदर्शनास आणले आहे.
जीसीएच्या कारभारात कोणतीही पारदर्शकता नाही आणि हिशेब तपासणी बाजूलाच राहिली आहे. या सर्व प्रकरणातून जीसीएत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आल्याचे रॉड्रिग्स यांनी म्हटले आहे.