क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
घोटाळा आणि आरोपांच्या फैऱयांत नेहमीच अग्रेसर असलेली राज्यातील सर्वांत श्रीमंत असलेली क्रीडा संघटना म्हणजे गोवा क्रिकेट संघटना आता परत एकदा प्रसिद्धीच्या झोतात येणार आहे. गोवा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष शांबा देसाई, उपसचिव सय्यद अब्दुल माजीद आणि खजिनदार परेश फडते यांनी सचिव विपुल फडके यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अध्यक्ष सूरज लोटलीकर यांना ई-मेल पाठवला आहे. विपुल फडके याची संघटनेच्या कामकाजात अनियमितता आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप या तिघांनीही केला आहे.
विपुल म्हणजे विनोद फडकेंचे पुत्र
जीसीएचे कार्यकारी मंडळ सहा सदस्यीय असून शांबा देसाई, अब्दुल माजीद व परेश फडते हे जीसीएचे माजी अध्यक्ष चेतन देसाई यांचे खंदे समर्थक आहेत. जीसीएच्या निवडणुका लवकरच होणार असून या निवडणुका आता चेतन देसाई आणि विनोद फडके यांच्यात रंगणार असल्याचे चित्र कालच्या ई-मेलमुळे निश्चित झाले आहे. सध्या सचिव असलेले विपुल फडके हे विनोद फडके यांचे पुत्र आहेत. मागील एका वर्षांपासून जीसीएत ही धुसफूस चालू होती. काल त्याचा स्फोट तिघांनी अध्यक्ष सूरज लोटलीकरांना ई-मेल पाठवून केला. ही ई-मेल म्हणजे निवडणुकीची नांदीच असल्याचे मत व्यक्त होत आहे.
संयम संपला म्हणून ई मेल पत्र पाठविले
जीसीएचे अध्यक्ष लोटलीकर सध्या विदेशात आहे. 25 मे रोजी ते गोव्यात येतील, तेव्हा हा ई-मेलचा सामना पुढे चालू होणार आहे. फडते, देसाई व माजीद या तिघांनी विपुलवर बेकायदा गोष्टेंना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे. आमचा संयम संपला म्हणून ते ई-मेल अध्यक्ष लोटलीकरांना पाठवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचा आतापर्यंतचा संयम आणि मौन हे व्यवस्थापकीय समितीमधील आमच्या सहकाऱयांबद्दलचा आदर आणि भावनात्मक संबंधाचा परिणाम होता, असे या तिघांनी लोटलीकरना पाठविलेल्या ई-मेलमध्ये लिहिलं आहे.
पाण्याच्या टाकीचा खर्च बनला मुख्य मुद्दा
सचिव विपुल फडकेचे जीसीएतील प्रत्येक कामकाज बेकायदेशीर आहे आणि नियमांचे उल्लंघन केलेले आहे. लोढा समितीच्या शिफारशीप्रमाणे आर्थिक व्यवसायाच्या नियमानुसार 5 लाखापर्यंत खर्चाची मर्यादा नमूद केली आहे. ज्याचे सचिव फडके यांनी कित्येकदा उल्लंघन केले आहे, असे या तिघांनी म्हटलं आहे. या घोटाळय़ात पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे त्याचे प्रमुख उदाहरण असल्याचे सांगून यासाठी 9 लाखांहून अधिक खर्च झाल्याचा आरोप या तिघांनी केला आहे. ही टाकी बांधताना कोणतीही प्रक्रिया पाळली गेली नाही तसेच याचे कंत्राट विपुलचे वडील विनोद फडके यांच्याशी हितसंबंधीताला देण्यात आल्याचे म्हटलं आहे.
कोणत्याच खर्चाच्या काढल्या नाही निविदा
याशिवाय जीसीएतील प्रत्येक खर्च नियम डालवून केला जातो. लोढा समितीच्या शिफारशींचे उल्लंघन करून क्रिकेटपटूंचे कपडे, प्रवास, निवास आणि इतर खर्च केल्याचा आरोप या तीन सदस्यांनी केला आहे. कधीच खर्चासाठी निविदा मागवण्यात आल्या नाहीत आणि मानद सचिवांच्या इच्छेनुसार पसंतीच्या पुरवठादारांना कंत्राटे देण्यात आली आणि यात स्वतःच्या आर्थिक हिताचा फायदा प्रत्येक वेळी विपुल फडकेने बघितला असा आरोपही तिघांनी केला आहे.
जीसीए“`
सचिव फडके यांनी लोढा समितीच्या शिफारसीनुसार आवश्यक जीसीएच्या वेबसाईटवर कधीही कोणतेही खर्च किंवा इतिवृत्त अपलोड केले गेले नाहीत. या प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असून तसे करण्यात अयशस्वी होणेही बेकायदेशीर असल्याचे या तिघांनी म्हटले आहे.
मासिक बैठका, आमसभाही रद्द
कॅग प्रक्रियात्मक विलंबाचे कारण देऊन खास आमसभाही रद्द करण्यात आली. आमसभा ही सर्वोच्च आहे. आणि कॅगची मान्यता कोणत्याही आमसभेच्या कामकाजात अडथळा आणू शकत नाही, असे या तिघांनी अध्यक्ष लोटलीकरांच्या निदर्शनास आणून दिले आहे. व्यवस्थापकीय मंडळाची मासिक बैठक न घेणे, जीसीएचा ई-मेल हॅक करणे तसेच मान्यता नसताना पर्वरी मैदानासाठी रिले टाकण्याचे काम हाती घेणे आदी आरोपही तीन सदस्यांनी केले आहेत.