श्रीहरीकोटा येथून झेप घेणार, दुसऱया कोरोना उद्रेकातील प्रथम उड्डाण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) जी-सॅट-1 या अवकाश यानाचे प्रक्षेपण 12 ऑगस्टला होणार आहे. कोरोनाच्या दुसऱया उद्रेककाळातील हे इस्रोचे पहिलेच उड्डाण असेल. कोरोना स्थितीमुळे या संस्थेला आपले अनेक कार्यक्रम टाळावे लागले होते. तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रकही नवे तयार करावे लागले होते.
सध्याच्या कार्यक्रमानुसार 12 ऑगस्टला पहाटे 5 वाजून 43 मिनिटांनी जी-सॅट-1 हा उपग्रह जीएसएलव्ही-एफ 10 या अवकाश वाहनातून प्रक्षेपित केला जाईल. हा उपग्रह भारताच्या सीमांवरील हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. तसेच हवामान आणि पर्जन्य यांच्या अनुमानांमध्ये साहाय्यभूत होणार आहे.
या उपग्रहाचे वजन 2,268 किलो इतके असून त्यात अत्याधुनिक सेन्सर्स बसविण्यात आले आहेत. अवकाशातून भारताच्या सीमांवर लक्ष ठेवून शत्रूच्या हालचालींची आधीच माहिती मिळविण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग होईल. 12 ऑगस्टला हवामान अनुकूल असेल तर प्रक्षेपण केले जाईल. अन्यथा कार्यक्रम पुढे ढकलावा लागेल. आतापर्यंत दोनवेळा हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे.