कोरोना संसर्गामुळे ब्रिटन दौरा टाळला : 12-13 जूनला ‘ऑनलाईन’ उपस्थिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 आणि 13 जून रोजी जी-7 शिखर परिषदेच्या व्हर्च्युअल सत्रामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) दिली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या आमंत्रणानुसार त्यांनी आपला दौरा निश्चित केला होता. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जी-7 परिषदेला प्रत्यक्ष उपस्थिती टाळली आहे. जी-7 शिखर परिषद 11 ते 13 जूनदरम्यान होत आहे. या परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन दाखल झाले आहेत. अध्यक्ष झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
मागील महिन्यातच परराष्ट्र मंत्रालयाने कोरोनाची स्थिती पाहून नियोजित दौऱयावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ब्रिटन दौरा रद्द झाल्याचे स्पष्ट केले. आता ते 12 आणि 13 जून रोजी या परिषदेमध्ये ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेसाठी ब्रिटनने भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या प्रमुखांना शिखर परिषदेला आमंत्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 मध्ये सहभागी होण्याची ही दुसरी वेळ आहे.
जी-7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. या परिषदेत विकसनशील देशांमध्ये कोरोना लसीची उपलब्धता, व्यापार, हवामान बदल आणि पायाभूत सुविधा पुनर्बांधणी या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच लस पुरवठय़ावरही दबाव आणला जाईल, असे बोलले जात आहे.